चप्पल निर्मितीची प्रक्रिया उलगडणाऱ्या ‘द कोल्हापुरी’ पुस्तकाला अकरा पुरस्कार
schedule29 May 26 person by visibility 42 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूरमधील कलापुरी आणि व्हि.एम.एल. ह्या जागतिक मेडिया एजन्सीच्या संयुक्त प्रयत्नांनी निर्मिलेल्या “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकास जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर, मुंबई येथे नुकत्याच पार पडलेल्या एक शानदार समारंभामध्ये अकरा “क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स” प्राप्त झाले आहेत. जाहीरात व क्रिएटीव्हिटीच्या क्षेत्रात क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्स हा एक जागतिक स्तरावरचा सन्मान समजला जातो. क्युरियस क्रिएटिव्ह अवॉर्ड्समधील सर्वोच्च अवॉर्ड “ब्लॅक एलिफंट” हा पुरस्कार देखील कलापुरीने प्राप्त केला. असल्याची माहिती प्रा.श्रीधर वैद्य,संस्थापक कलापूरी अपर्णा चव्हाण, आतीष चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली. सन्मान कार्यक्रमास प्रसिध्द लेखक व प्रसारभारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी, क्युरियसचे राजेश केजरीवाल, व्हि.एम.एलच्या सि.ई.ओ. बबिता बरूआ, व्हि.एम.एलचे क्रिएटिव्ह ग्रुपचे प्रमुख श्री. कल्पेश पाटणकर उपस्थित होती. प्रसिद्ध सिनेदिग्दर्शक गौरी शिंदे, हर्षद राजाध्यक्ष, राहुल मॅथ्यू ह्या सारख्या दिग्गजांनी ज्यूरी म्हणून काम पहिले. कोल्हापूरमध्ये कारागिरांच्या अनेक पिढ्या अत्यंत बारकाईने व कुशलतेने कोल्हापुरी चपला हाताने बनवत आल्या आहेत. कोल्हापुरी चप्पल ही पारंपरिक कला, कौशल्य आणि अप्रतिम कारागिरीचे प्रतीक आहे. जागतिक फॅशन उद्योगाने अनेकदा कोल्हापुरी चप्पलच्या कौशल्यपूर्ण डिझाईनचे कौतुक केले आहे, परंतु त्याचे मूळ आणि त्यामागील लोकांकडे दुर्लक्ष केले आहे.
पिढ्यानुपिढ्या कोल्हापुरी चप्पलची कला जोपासणाऱ्या कारागिराना त्यांच्या कलेचे श्रेय देण्याचे काम “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकाने केले आहे. मिलान फॅशन वीक २०२५ मध्ये, प्राडाने कोल्हापुरी चपलांशी अगदी मिळत्याजुळत्या असलेल्या चपला त्यांच्या मूळ उत्पत्तीचे किंवा निर्मात्यांचे श्रेय न देता प्रदर्शित केल्या, ज्यामुळे भारतात संतापाची लाट उसळली. याचा फक्त निषेध नोंदवण्याऐवजी कोल्हापुरी चप्पलसाठी जी. आय. मार्क प्राप्त असणाऱ्या 'कलापुरी'ने एक वेगळा मार्ग निवडला. कलापुरीने 'द कोल्हापुरी' हे हाताने बनवलेले पुस्तक तयार केले, ज्यामध्ये या कलेचा हजार वर्षांचा प्रवास आणि त्यामागील कारागिरांची माहिती दस्तऐवजीकृत केली आहे. कलापुरी निर्मित “द कोल्हापुरी” ह्या पुस्तकास जागतिक स्तरारवर मिळालेला प्रतिसाद हा अभूतपूर्व आहे. ह्या सर्व पुरस्कारांचे खरे मानकरी हे कोल्हापुरी चप्पल बनवणारे कारागीर आणि कोल्हापूरची जनता आहे. कलपुरीला मिळालेली सर्व अवॉर्डस आम्ही ह्या कारागीर आणि कोल्हापूरच्या जनतेला समर्पित करतो.असे श्री. आतिष चव्हाण यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला अमृता काळे उपस्थित होत्या.