Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात आंदोलनांचे जंतर-मंतर ! भाजप - काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर, प्रचंड घोषणाबाजी ! !गडहिंग्लजमधील आरटीई २५ टक्के प्रवेशातील  अनियमिततेची चौकशी; त्रिसदस्यीय समिती नियुक्तखोट्याला संरक्षण द्यायच्या नावाखाली नेत्यांनी खऱ्यांवर अन्याय करू नये : सुधीर मसवेकरअमेरिकेतील बीएमएम संमेलनात अनुराधा भोसले करणार मार्गदर्शनगुणीदास फाऊंडेशनतर्फे शनिवारी तीर्थ विठ्ठल कार्यक्रमएसआयआरच्या कामासाठी गैरहजर , जिपच्या चार कर्मचाऱ्यांवर गुन्हाजिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हंगामा, सदस्यांकडून अधिकारी सभेतून ‘आऊट’गुरुवारच्या महाराष्ट्र बंदमध्ये कोल्हापूरकरांनी सहभागी व्हावे : वंचित - डाव्या आघाडीचे आवाहनजिल्हा परिषदेत अजित पवार यांची जयंती साजरीराज्य सरकारमार्फत अनेक लोकोपयोगी उपक्रम सुरू - आमदार राजेश क्षीरसागर

जाहिरात

 

कोल्हापुरात आंदोलनांचे जंतर-मंतर ! भाजप - काँग्रेसचे कार्यकर्ते एकमेकांविरोधात रस्त्यावर, प्रचंड घोषणाबाजी ! !

schedule23 Jul 26 person by visibility 55 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :  दिल्लीतील जंतरमंतरवरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी लोकसभेतील विरोधी पक्षनेते व काँग्रेसचे नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानासमोर केलेल्या आंदोलनाचे पडसाद गुरुवारी २३ जुले २०२६कोल्हापुरातही उमटले. काँग्रेसच्या आंदोलनाच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षातर्फे कोल्हापुरातील काँग्रेस कार्यालयासमोर मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चाला प्रतिउत्तर म्हणून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन रोडवरील पक्ष कार्यालयासमोर गर्दी करत भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. मात्र पोलिसांनी व्यवस्थितपणे परिस्थिती हाताळत भाजप व काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आमनेसामने येऊ दिले नाही. काँग्रेस कार्यालयाकडे निघालेल्या भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्यावर अडवित ताब्यात घेतले. तर भाजपच्या मोर्चाकडे निघालेल्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी, पक्ष कार्यालयासमोरच अडविले. मात्र आपआपले पक्ष आणि नेत्यांच्या समर्थनार्थ दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरुन घोषणाबाजी केल्यामुळे आंदोलनाचे जंतरमंतर कोल्हापुरात पाहावयास मिळाले.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आंदोलनाच्या विरोधात भाजपाने मोर्चाचे नियोजन केले होते. व्हिनस कॉर्नर येथे भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ते दुपारी साडे चार वाजण्याच्या सुमारास जमले. आमदार अमल महाडिक, महापौर रुपाराणी निकम, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, स्थायी समितीचे सभापती विशाल शिराळे, प्रा. जयंत पाटील, सभागृह नेते मुरलीधर जाधव, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश पदाधिकारी महेश जाधव, महिला व बालकल्याण समिती उपसभापती दीपा ठाणेकर, नगरसेवक विजय देसाई, वैभव कुंभार, नगरसेविका पल्लवी देसाई, अर्चना कोराणे, राजनंदा महाडिक, नेहा तेंडुलकर, सृष्टी जाधव, निलिमा पाटील, सुनील वाडकर, हेमंत आराध्ये, डॉ. राजवर्धन, विराज चिखलीकर, करण जाधव, गायत्री राऊत, विश्वजीत पवार,   यांच्यासह कार्यकर्ते मोठया संख्येने मोर्चात सहभागी झाले.‘शरम करो शरम करो - राहुल गांधी शरम करो, लोकशाहीचा अपमान हीच काँग्रेसची ओळख, समाजात फूट देशात संघर्ष हाच काँग्रेसचा स्वभाव ’ या आशयाचे फलक कार्यकर्त्यांच्या हाती होते. ‘देश का नेता कैसा हो, नरेंद्र मोदी जैसा हो’अशा घोषणा देत मोर्चा स्टेशन रोडकडे मार्गस्थ झाला. व्हिनस कॉर्नरपासून घोषणा देत कार्यकर्ते काँग्रेस कार्यालयकडे निघाले. दरम्यान पोलिस प्रशासनाने रेल्वे स्टेशनसमोरील रस्त्यावर बॅरेकटस लावून मोर्चा अडविला. या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या. काहीनी पोलिसांचे कडे तोडण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ताब्यात घेत काँग्रेस कार्यालयाकडे जाण्यापासून रोखले.  आमदार महाडिक, महापौर निकम, उपाध्यक्ष पाटील, नगरसेवक पाटील यांच्यासह नगरसेवक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पोलिसांनी व्हॅनमधून अलंकार हॉलकडे नेले.

भाजपच्या मोर्चाला उत्तर देण्यासाठी काँग्रेसच्या कार्यकर्ते स्टेशन रोडवरील काँग्रेस कार्यालयासमोर एकवटले होते. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी डोक्याला काळ्या फिती लावून व हातात काळे झेंडे घेऊन दिल्ली येथे विद्यार्थ्यांच्या मोर्चावर झालेल्या लाठीमाराचा निषेध केला. ' राजीनामा द्या राजीनामा द्या -  नरेंद्र मोदी राजीनामा द्या, नरेंद्र मोदी वीक है -तभी तो पेपर लिक है,  धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या, चले जाओ चले जाओ -भाजप सरकार चले जाओ," अशा घोषणा दिल्या. "राहुल गांधी तुम आगे बढो हम तुम्हारे साथ है" अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी एकजूट दाखवली. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रवीण केसरकर, काँग्रेसच्या पदाधिकारी सरला पाटील,  भारती पोवार, चंदा बेलेकर, काँग्रेसचे महापालिकेतील गटनेते इंद्रजीत बोंद्रे, नगरसेवक विनायक फाळके, राहुल माने, प्रतापसिंह जाधव अर्जुन माने, अमर समर्थ, दुर्वास कदम, सचिन शेंडे, दिपाली घाटगे, ऋग्वेदा माने, सचिन चौगले, विनायक कारंडे, सुनील मोदी, मुस्ताक मलबारी,  माजी नगरसेवक विजय सूर्यवंशी, अशोक भंडारी, अजित पवोवार धामोडकर, अमोल माने, तोफिक मुलानी, चंद्रकांत सूर्यवंशी, संजय पोवार वाईकर, संपतराव चव्हाण पाटील, वेदवती मोहिते, अभिषेक मिठारी, विकास सूर्यवंशी, संतोष जरग, संजय पटकारे, प्रवीण पाटील आदींचा समावेश होता.  काँग्रेस कार्यालयाच्या समोरील आवारात  पदाधिकाऱ्यांची भाषणे झाली यावेळी भारतीय जनता पक्षाच्या सरकारकडून विद्यार्थ्यांच्यावर होत असलेल्या अन्यायाचा निषेध करण्यात आला. भाजपचा मोर्चा काँग्रेस कार्यालयाकडे येत असल्याचे समजल्यावर काँग्रेस कार्यकर्ते त्या मोर्चाला सामोरे जाण्यासाठी सरसावले. तेव्हा पोलिसांनी त्यांना काँग्रेस कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरील रस्त्यावर रोखले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes