कागलात राजकीय फटाके, तावरे शिवसेनेत ! राष्ट्रवादीच्या शीतल फराकटेंची बंडखोरी, अपक्ष लढणार ! !
schedule20 Jan 26 person by visibility 124 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : गटातटात विखुरलेल्या कागलच्या राजकारणात जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीवरुन राजकीय फटाके वाजण्यास सुरुवात झाली आहे. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य परशुराम तावरे यांच्या पत्नी अश्विनी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. तर राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी जिल्हा परिषदेची उमेदवारी न मिळाल्यामुळे बंडखोरीच्या पावित्र्यात आहेत. त्यांनी अपक्ष म्हणून निवडणूक ल ढविण्याची घोषणा केली आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना कागल तालुक्यातच स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत बंडखोरीचा सामना करावा लागणार आहे.
२०१२ मधील जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत परशुराम तावरे यांनी कापशी जिल्हा परिषद मतदारसंघातून मंत्री हसन मुश्रीफ यांचे चिरंजीव नविद मुश्रीफ यांचा पराभव केला होता. त्यावेळी या निकालाची प्रचंड चर्चा झाली होती. जिल्हा परिषदेची टर्म संपल्यानंतर तावरे हे गेले काही वर्षे भारतीय जनता पक्षात सक्रिय होते. त्यांची २०२४ मध्ये कागल विधानसभा भाजप संयोजक प्रमुखपदी नियुक्ती झाली होती. दरम्यान जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या पत्नी अश्विनी यांनी धनुष्यबाण हाती घेतला आहे. पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या उपस्थितीमध्ये त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. याप्रसंगी गोकुळचे संचालक सुजित मिणचेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, शिवसेना कागल तालुकाप्रमुख सुधीर पाटोळे, नंदकुमार सुर्यवंशी उपस्थित होते.
दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे यांनी जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष म्हणून लढण्याची घोषणा केली आहे. त्यांनी सोशल मिडियावर पोस्ट करत मंत्री मुश्रीफ यांच्यावरही निशाणा साधला. त्या म्हणाल्या, ‘गेली दहा वर्षे काम मी राष्ट्रवादीत काम करत आहे. गेली चाळीस वर्षे आमची मागील पिढी व गेल्या दहा वर्षापासून मी, मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी काम केले. मंत्री मुश्रीफ यांच्याकडे मी जिल्हा परिषदेची उमेदवारी मागितली.त्याही पलीकडे गेल्या दीड वर्षापूर्वी मंत्री मुश्रीफ यांनी मला जिल्हा परिषदेसाठी उमेदवारीचा शब्द दिला होता. गेली अनेक वर्षे आम्ही मंत्री मुश्रीफ यांचा प्रचार केला होता. त्यांची भूमिका ठामपणे मांडण्याचा प्रयत्न केला. विरोधकांवर टीका केली. पक्ष आणि नेत्यांप्रती निष्ठा जपली.असं असतानाही आमच्या पदरी पिढयानपिढया निराशा का पडते ? हा प्रश्न पडत आहे. की फक्त आम्ही झेंडा घ्यायच ? माइक घ्यायचा आणि सभा गाजवाजच्या ? एवढंच आमचं काम आहे का ? सर्वसामान्यांसाठी काम करण्याकरिता नेतेमंडळी कधीच स्थान देणार नाहीत का हा प्रश्न पडत आहे. आमची नाळ सामान्य लोकांशी जुळली आहे. माझी लढाई कोणाविरोधात नाही, पण सर्वसामान्य जनता, शेतकरी, महिला वर्गाकरिता काम करण्यासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे.’