शिवसेनेकडे मुलाखतीसाठी इच्छुकांची गर्दी, ७५० जणांनी मागितली उमेदवारी
schedule19 Jan 26 person by visibility 19 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेतर्फे रविवारी (१८ जानेवारी २०२६) कोल्हापुरात मुलाखती झाल्या. शिवसेनेकडून लढणाऱ्या इच्छुकांची मोठी संख्या दिसून आली. नागाळा पार्क येथील कार्यालय इच्छुक उमेदवार व कार्यकर्त्यांनी गजबजले. दिवसभरात शिरोळ तालुका वगळता अन्य अकरा तालुक्यातील ७५० हून अधिक इच्छुकांनी उमेदवारी मागितली.
पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धैर्यशील माने, आमदार चंद्रदीप नरके, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुजित मिणचेकर, उल्हास पाटील, शेतकरी सेनेचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, शिवसेना जिल्हा समन्यवक सत्यजीत कदम, शिवसेना जिल्हाप्रमुख विजय बलुगडे, रवींद्र माने, सुजित चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये या मुलाखती झाल्या. दिवसभरात चंदगड, गडहिंग्लज, आजरा, हातकणंगले, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, करवीर, कागल, राधानगरी आणि भुदरगड तालुक्यातील मुलाखती झाल्या.