कोल्हापुरात चौदा मार्चला फार्मा करंडक, चौदा फार्मसी महाविद्यालयांचा सहभाग
schedule11 Mar 26 person by visibility 48 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील चौदा फार्मसी महाविद्यालयांचा ‘फार्मा करंडक २०२६’ हा आंतरमहाविद्यालयीन सांस्कृतिक महोत्सव चौदा मार्च २०२६ रोजी आयोजित केला आहे. सायबर कॉलेज परिसरातील आनंदभव सभागृहात हा कार्यक्रम होत आहे. या एकदिवसीय महोत्सवात नृत्य, नाटय, संगीतासह विविध कलाप्रकारांच्या सांस्कृतिक स्पर्धा होणार आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा या तीन जिल्ह्यातील फार्मसी महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थी कलासादरीकरण करणार आहेत. स्पर्धेसाठी दोन सांघिक व दहा वैयक्तिक पारितोषके आहेत. अशी माहिती प्राचार्य डॉ. एच. एन. मोरे यांनी पत्रकार परिषदेत दिली. ‘फार्मसी विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी राबविलेला हा एक स्त्युत्य उपक्रम आहे. या निमित्ताने विद्यापीठांशी संलग्न असलेल्या विविध महाविद्यालयातील स्नेहबंध अधिक दृढ होण्यास मदत होईल.’असे त्यांनी सांगितले. सांस्कृतिक स्पर्धेचे यंदाचे १४ वे वर्ष आहे. पत्रकार परिषदेला प्राचार्य डॉ. सुरेश किल्लेदार, डॉ. अनसार पटेल, प्रा. स्वप्निल हराळे, सुदर्शन अजित आदी उपस्थित होते.