वाढीव सभासद संस्थेवरुन गोकुळमध्ये महायुतीमध्ये झुंपली ! मंत्री मुश्रीफ - आमदार शिवाजी पाटील आमनेसामने
schedule13 Apr 26 person by visibility 4 categoryराजकीय
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या निवडणुकीअगोदरच आरोप, प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. विशेष म्हणजे, महायुतीमधीलच एक मंत्री आणि एक आमदार यांच्यामध्ये नवा संघर्ष सुरू आहे. वाढीव सभासदवरुन चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘एका मंत्र्यांच्या आशीर्वादाने गोकुळमध्ये गैरकारभार सुरू आहे. गेल्या पाच वर्षात नियमबाहयरित्या ३७०० दूध संस्थांची नोंदणी झाली. गोकुळ दूध संघ हा सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या हातात राहिला पाहिजे. तो कोणत्याही घराणेशाहीच्या ताब्यात जाऊ नये यासाठी आमचा लढा आहे. या साऱ्या प्रकाराची चौकशी झाली पाहिजे, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे’अशा शब्दांत त्यांनी तोफ डागली. मंत्री मुश्रीफ यांनी आमदार पाटील यांचे गैरसमज झाले आहेत, त्यांना दूध संस्थांची नोंदणी प्रक्रिया समजावून सांगितली जाईल. शिवाय त्यांच्या मागचा बोलविता धनी कोण ? असा पलटवार मुश्रीफ यांनी केला आहे.
आमदार शिवाजी पाटील यांनी पत्रकार परिषद घेत गोकुळच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत ईडीच्या चौकशीची मागणी केली. तसेच प्रशासक नियुक्त करावा यासाठी मुख्यमंत्र्याना भेटणार असल्याचे सांगितले. भाजप नेते व आजराचे नगराध्यक्ष अशोक चराटी,गोकुळचे माजी संचालक दिपक पाटील, शांताराम पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पत्रकार परिषद झाली. आमदार पाटील म्हणाले, ‘गोकुळ दूध संघ हा सर्वसामान्य दूध उत्पादकांच्या मालकीचा असला पाहिजे तो कोणत्याही घराणेशाहीच्या ताब्यात जाऊ नये यासाठी आमचा लढा आहे .दूध उत्पादकांच्या हितासाठी आपण लढत राहू. गोकुळमध्ये चुकीचा कारभार सुरू आहे. त्या साऱ्या प्रकाराला एका मंत्र्यांचा आशीर्वाद आहे. त्यांच्या आशीर्वादामुळे तत्कालिन अधिकारी महेश कदम यांनी ३७०० नवीन दूध संस्थांच्या नोंदणीस मंजुरी दिली. गोकुळच्या मागील निवडणुकीत ३८०० दूध संस्था पात्र होत. पाच वर्षात ३७०० दूध संस्थ वाढल्या. या तीन हजार संस्थांची नोंदणी महेश कदम यांनी केली आहे. या साऱ्या संस्था ठराविक तालुक्यातील आहेत. कागल, राधानगरी, करवीर तालुक्यातील संस्थांची नोंदणी झाली आहे. अशामुळे इतर तालुक्यातील संस्थांचे अस्तित्व संपून जाईल. गोकुळमधील अशा चुकीच्या कारभाराला आमचा विरोध असेल. महायुती म्हणून गोकुळ दूध संघात आम्ही सगळे एकत्र असलो तरी चुकीचे कामकाज, भ्रष्टाचार खपवून घेतले जाणार नाही.’असे ते म्हणाले,.
मंत्री मुश्रीफ यांनी आमदार पाटील यांच्या आरोपाला उत्तर दिले आहे. मुश्रीफ यांनी म्हटले आहे,‘ माझी आणि आमदार शिवाजीराव पाटील यांची भेट झाल्यानंतर त्यांच्या मनातील सगळे गैरसमज, शंका- कुशंका आणि प्रश्न दूर होतील. पाटील यांना दूध संस्था नोंदणीची प्रक्रियाही सविस्तर समजावून सांगेन. गोकुळ दूध संघामध्ये आजघडीला महायुतीची सत्ता आहे. यामध्ये पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा आमदार म्हणून मी, जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे, आमदार राजेंद्र पाटील- यड्रावकर, आमदार चंद्रदीप नरके, भाजपाचे माजी आमदार संजयबाबा घाटगे व इतर नेतेमंडळी आम्ही सत्तेमध्ये सहभागी आहोत. सन्माननीय मुख्यमंत्री महोदय आणि आमची याबद्दल सविस्तर चर्चा झालेली आहे. ही सगळी माहिती आमदार पाटील यांना कळाली की त्यांच्या सगळ्या शंकांचे आणि गैरसमजांचे निरसन होईल, अशी मला खात्री आहे. आमदार पाटील यांची जी वक्तव्ये आहेत ते पाठीमागून त्यांना कुणीतरी चुकीचे "प्राॅम्टींग" करीत असल्यासारखे वाटते. आमदार पाटील यांचा मोठा गैरसमज झालेला दिसतोय. दूध संस्था नोंदणी करतानाची काय -काय प्रक्रिया असते, हे सुद्धा मी त्यांना समजावून सांगेन. सरकारी अधिकारी ही कोणतीही बेकायदेशीर गोष्ट करू शकत नाहीत.महेश कदम हे सहाय्यक निबंधक- दुग्ध कधीच नव्हते. माझ्या माहितीनुसार या दूध संस्थांची नोंदणी दुग्धचे सहाय्यक निबंधक गजेंद्र देशमुख आणि प्रदीप मालगावे यांच्या काळामध्ये झालेली आहे.