+91 8329558262, +91 8552827575 | maharashtranewsone@gmail.com |
Breaking News
adjustप्राथमिक शिक्षण समितीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, शिक्षक-मुख्याध्यापकांचा गौरव adjustमतदानासाठी जिल्ह्यातील उद्योग बंद राहणार, औद्योगिक संघटनांचा निर्णय adjustधैर्यशील मानेंना दुसऱ्यांदा संसदेत पाठविण्यासाठी जोमाने कामाला लागा - विनय कोरे adjustआरटीई अंतर्गत विद्यार्थ्यांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करावेत adjustअमृ़त संजीवनी योजना जाणीवपूर्वक सभासदांच्या माथी-शिक्षक संघाचा आरोप adjustमोदींना पंतप्रधान करण्यासाठी धैर्यशील मानेंना निवडून आणू : मंत्री चंद्रकांत पाटील adjustमहायुतीवर महाविकास आघाडीची कुरघोडी, २२८ नगरसेवकांचा शाहू महाराजांना पाठिंबा ! adjustदूध वाढीसाठी कुशिरेचं पुढचं पाऊल, करनाल, कोलारमधून आणले पशुधन adjustचेतन नरकेंची निवडणुकीतून माघार ! भविष्यात चार पावलांची झेप घेण्यासाठी दोन पाऊल मागे !! adjustहॅटस ऑफ, यूपीएससीत कोल्हापूरच्या तिघांचे यश
Screenshot_20240226_195247~2
schedule30 Sep 20 person by visibility 1507 categoryसंपादकीय

 आपासाहेब माळी, कोल्हापूर : कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी प्रशासन, स्वानिक स्वराज्य संस्था युद्धपातळीवर काम करत आहेत. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी, मंत्री, आमदार, जिल्हा परिषद सदस्य, नगरसेवक पासून ते पंचायत समिती, ग्रामपंचायत सदस्यापर्यंत जणू प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी शर्थीचे प्रयत्न करतोय प्रशासनाने नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सामाजिक अंतर राखण्याचे,गर्दी टाळण्याचे आवाहन करत आहेत. प्रसंगी संबंधितावर कारवाई सुरू आहे. इतक्या पातळीवर प्रयत्न सुरू असताना आणि प्रत्येकजण ‘घरी राहा, सुरक्षित राहा’हे सूत्र अंगिकारुन कोरोनाला हरविण्याची गरज असताना परवा कागलमध्ये मात्र या साऱ्या प्रयत्नांना फाटा दिला. ना सोशल डिन्स्टन्सिंगचे पालन , ना गर्दी टाळली. सरकार आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक नियमांना फाटा देऊन मंत्री महोदयांचा जल्लोषी स्वागत सोहळा झाला. रस्त्याच्या दुतर्फा नागरिकांच्या गर्दीत मिरवणूक निघाली. हे पाहून जिल्ह्यातील नागरिकच म्हणत आहेत, मुश्रीफ साहेब, भावनेच्या भरात कार्यकर्त्यांचा अतिउत्साहपणा बरा नव्हे.  

ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या माध्यमातून जिल्ह्याला तीन मंत्रीपदे मिळाली आहेत. कोरोनाच्या विरोधात प्रतिबंधात्मक उपाययोजनेसाठी तिघेही प्रयत्नशील आहेत. सरकार दरबारी वजन वापरुन निधी, वैद्यकीय साहित्य आणत आहेत. या सगळया जमेच्या बाजू आहेत. तरीसुद्धा जिल्ह्यातील कोरोनाचा विळखा सैल झाला नाही. गेल्या चार दिवसात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या कमी होत आहे हे निश्चितच दिलासादायक आहे.

 मात्र त्यापूर्वी जिल्ह्यातील रुग्णांची उपचारासाठी जी धावपळ उडाली, बेडअभावी उपचाराला झालेल्या विलंबामुळे ज्या यातना झाल्या, वेळेत उपचार मिळाले नाहीत म्हणून अनेक रुग्णांना हॉस्पिटलच्या वाटेवर जीव गमवावा लागला.उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यासाठी गेलेल्या रुग्णांचा चेहरा पाहण्याचे काही कुटुंबीयांच्या नशिबी आले नाही. आप्तस्वकीयांच्या अंत्यदर्शनाला अनेकांना जाता आले नाही. व्यापार, व्यवसाय बंद झाल्यामुळे अनेकांची उपासमार झाली. इतकी बिकट परिस्थिती जिल्ह्यात होती. कोरोनाच्या महामारीमुळे सगळेच हतबल बनले होते.

तरीसुद्धा परिस्थितीपुढे शरण न जाता प्रत्येकजण ‘कोरोना योद्धा’बनून सध्य स्थितीवर मात करण्यासाठी धडपडतोय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ‘माझं कुटुंब,माझी जबाबदारी’ हे सूत्र अंगिकारुन परिस्थिती नियंत्रणात राहण्यासाठी हातभार लावत आहे. जिल्हाधिकारी दौलत देसाई यांच्या ‘नो मास्क नो एंन्ट्री’या संकल्पनेचे खुद्द मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कौतुक केले. आयुक्त मल्लिनाथ कलशेट्टी, सीईओ अमन मित्तल हे महापालिका आणि जिल्हा परिषद यंत्रणेच्या माध्यमातून कोरोनाचा अटकाव करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी गाव पातळीवर उत्स्फूर्तपणे ‘जनता कर्फ्यू’पुकारला. जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी झाली. ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांनी पुढाकार घेऊन कागल तालुक्यात ‘जनता कर्फ्यू’ पुकारला. काहींनी पुन्हा कशाला ‘जनता कर्फ्यू’असा विरोधाचा सूर आळवला. मात्र बहुतांश लोकांच्या आरोग्याच्या हिताचा विचार करुन, त्या मूठभर लोकांचा रोष पत्करुन मंत्री मुश्रीफ यांनी प्रशासन व लोकप्रतिनिधींना सोबतीला घेऊन ‘जनता कर्फ्यू’ची अंमलबजावणी प्रभावीपणे केली.

खरं तर, लोकप्रतिनिधी म्हटलं की विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी लोकांचा त्यांच्याभोवती सतत गराडा असतो. प्रत्येकाची प्रश्न वेगळी, समस्या वेगळया. मंत्री मुश्रीफ यांच्या धडाकेबाज कामकाज पद्धतीमुळे त्यांच्या भोवती नेहमी लोकांचा, कार्यकर्त्यांचा गराडा असतो. त्यांनी गरजू लोकांना मिळवून दिलेली वैद्यकीय मदतकार्याला तोड नाही. कोरोनाच्या कालावधीत त्यांनी विविध बैठका घेऊन, अधिकारी, लोकप्रतिनिधींना सोबत घेऊन लोकांना दिलासा दिला. जिल्ह्यात कोणतेही संकट उद्भवू दे, लोकांसाठी ते हक्काचे आधारवड अशी एक भावना निर्माण झाली आहे.

……………….

नागरिकांच्या भावना रास्त, पण गर्दी करण्याची वेळ चुकली

मंत्री मुश्रीफ यांना कोरोनाची बाधा झाली. त्यांनी कोरोनावर मात केली. घरीही परतले. मंत्री मुश्रीफ हे जबाबदार, परिस्थितीचे भान असणारे नेते म्हणून ओळखले जातात. मात्र कोरोनामुक्तीनंतर कागलमध्ये स्वागताचा जो जल्लोष झाला. तो या काळात निश्चितच योग्य नव्हता. सध्याच्या कोरोनाच्या कालावधीत सोशल डिन्स्टन्सिंग, गर्दी टाळण्यासाठी प्रशासन जीव तोडून लोकांचे प्रबोधन करत आहेत. मात्र सरकारमधील प्रमुख मंत्री असलेल्या मुश्रीफ यांच्या उपस्थितीमध्ये कार्यकर्त्यांनी ही सगळी मार्गदर्शक नियमावलींना कट्ट्यावर बसविल्याचे चित्र होते. कोरोनावर मात केल्यामुळे मुश्रीफ यांच्याविषयी नागरिकांच्या सदिच्छा, त्यांच्याप्रेमापोटी शुभेच्छा देणे हे सगळे रास्त आहे. नेत्यांच्या स्वास्थ्यासाठी देवदेवतांना दंडवंत घालणं, नवस बोलणे हा ज्यांच्या त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. मात्र कोरोनाच्या कालावधीत त्या व्यक्तीगत बाबींचे जाहीर प्रदर्शन करणे, कोरोनामुक्तीनंतर घरी परतताना स्वागत सोहळयाला इव्हेंटचे स्वरुप देणे, मिरवणुका काढणे करणे यामधून नेमके काय साध्य करायचे आहे? सध्या कसल्याही निवडणुका नाहीत. मग शक्ती प्रदर्शनासारखा इव्हेंट घडविण्यामागील समर्थक व कार्यकर्त्यांचा इरादा काय ? खरं तर, कागलमध्ये स्वागतासाठी झालेली गर्दी, नागरिकांच्या सहभागात निघालेल्या मिरवणुकीची वेळ चुकीची होती.

……………..

कार्यकर्त्यांच्या अतिउत्साहीपणाला आवर घालायलाच हवा

मंत्री मुश्रीफ हे जिल्ह्यातील जबाबदार नेते आहेत. ते फक्त कागलपुरते मर्यादित नाहीत. महापालिका, जिल्हा परिषद, मध्यवर्ती बँक, नगरपालिका, बाजारसमिती अशा प्रत्येक ठिकाणच्या सत्तेत त्यांचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष सहभाग आहे. त्यांना मानणाऱ्या कार्यकर्त्यांची संख्या मोठी आहे. त्यांच्या कोणत्याही गोष्टीचे अनुकरण करण्यासाठी ते तत्पर असतात. यामुळे नेत्यांची प्रत्येक कृती विचारपूर्वक हवे असे जाणकारांचे मत आहे.स्वत: मुश्रीफ यांनीच कार्यकर्त्यांना सांगायला हवे होते. नियमही आपणचे करायचे, त्या नियमांचे पालन करण्याविषयी लोकांना आवाहन करायचे आणि दुसरीकडे आपल्याच कार्यकर्त्यांनी त्या नियमांची खुलेआम पायमल्ली करायची हे बरं नव्हं ! नेत्यांनी, कार्यकर्त्यांच्या अतित्साहाला आवर घालायलाच हवा अशीच भावना नागरिकांची आहे. प्रशासनातील अधिकारी, कर्मचारी हे भाजी मंडईत, मार्केटमध्ये, घाट परिसरात फेरीवाले, फळ विक्रेते यांनी सामाजिक अंतर राखले नाही म्हणून कारवाईसाठी सरसावते. अशी कारवाई योग्यच आहे पण परवा शेकडो लोक एकवटले, वाजतगाजत मिरवणूक काढली पण प्रशासनाला ती काही दिसली नाही. सरकारी नियम मोठ्या लोकांसाठी एक आणि सामान्य नागरिकांसाठी दुसरा असा प्रकार योग्य नये. मुळात नियमावली, त्याची अंमलबजावणी ही सोयीने करायची नसते, याचे भान साऱ्यांनाच हवे.