
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : अखिल भारतीय आयुर्वेद संमेलनच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी वैद्य दिलखुष तांबोळी व सचिवपदी वैद्य विनायक शिंदे यांची निवड झाली आहे. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या शिर्डी येथे झालेल्या पदग्रहण समारंभात या निवडी घोषित करण्यात आल्या. महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन ही संस्था आयुर्वेदाच्या प्रचार व प्रसार कार्यासाठी सतत कार्यरत असलेली संस्था आहे. या संस्थेच्या भारतभर अनेक शाखा असून संपूर्ण भारतभर आयुर्वेदाचा प्रचार व प्रसार कार्य करणारी व सर्वात जुनी असलेली ही संस्था म्हणजे अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन संस्था आहे. याचे मुख्य कार्यालय दिल्ली येथे असून संस्थेच्या आधारस्तंभ राज्य वैद्य व पद्मश्री वैद्य देवेंद्र त्रिगुणा यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्य राकेश शर्मा हे या संस्थेचे अध्यक्ष आहेत.
"आज आयुर्वेदाला जे यश किंवा सुवर्ण दिन दिसत आहेत त्यामध्ये अप्रत्यक्षपणे महाराष्ट्र आयुर्वेद संमेलनाच्या रूपाने या वैद्य वर्गाने केलेल्या कामाचा मोठा सहभाग आहे. भविष्यात सर्वांच्या सहकार्याने आयुर्वेद प्रचार व प्रसाराचे कार्य महाराष्ट्र आयुर्वेद संमेलन करणार आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आम्ही कार्य करणार आहोत" असे अध्यक्ष वैद्य दिलखुश तांबोळी तर सचिव वैद्य विनायक शिंदे यांनी सांगितले आहे.