
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : एकाच छताखाली जागतिक दर्जाच्या वैद्यकी सुविधा उपलब्ध करून देणारे कोल्हापूर कॅन्सर सेंटर आज पश्चिम महाराष्ट्रासह कर्नाटक,गोवा राज्यांतील कॅन्सर रुग्णांना वरदान ठरले आहे.हे सेंटर घडविण्यात दिवंगत भास्कर लाला पवार यांचे योगदान कोल्हापूरसाठी निश्चितच अभिमानास्पद आहे.आपल्या वडिलांचा हा सामाजिक वारसा प्रख्यात कॅनसरतज्ज्ञ डॉ.सुरज पवार आणि कॅन्सरतज्ज्ञ डॉ रेश्मा पवार हे रुग्णसेवेतून दाखवत असल्याचे गौरवोद्गार अमेरिकेतील ख्यातनाम डॉ.रवी गोडसे यांनी काढले.
कोल्हापूर कॅन्सर सेन्टर आणि छत्रपती शाहू कॅन्सर रिसर्च फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचे संस्थापक दिवंगत भास्कर लाला पवार यांच्या स्मरणार्थ सुरू करण्यात आलेला पहिलाच " भास्कर लाला पवार जीवन गौरव पुरस्कार " अवनि संस्थेच्या प्रमुख अनुराधा भोसले यांना देण्यात आला.
यावेळी कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचे चेअरमन व मॅनेजिंग डायरेक्टर डॉ.सुरज पवार,एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ.रेश्मा पवार,डॉ.योगेश अनाप, डाॅ.पराग वाटवे, डॉ.वैशाली चव्हाण, डॉ.मंजुषा मैत्रिणी, श्रीमती शांताबाई भास्कर पवार, डॉ. आदित्य पवार, सीईओ डॉ.शिरीष भामरे आदी उपस्थित होते.
डॉ.सुरज पवार यांनी या पुरस्काराची माहिती दिली. तसेच समाजातील सर्व स्तरातील व अतिगरजूंना कॅन्सर सारख्या दुर्दम्य आजारावर मोफत वा अल्प दरात एकाच छताखाली सर्व सुविधा मिळाव्यात यासाठी वडिल भास्कर पवार यांची धडपड नमूद केली. शाहू कॅन्सर रिसर्च फॉउंडेशनचे ट्रस्टी डॉ.संदीप पाटील यांनी सेंटरच्या सेवाभावी उपक्रमांची माहिती दिली.
पुरस्कारप्राप्त अनुराधा भोसले म्हणाल्या, " भास्कर लाला पवार यांना आपण जवळून पहिले आहे. त्यांनी अवनि संस्थेला मदत केली आहे. त्यांचे सामाजिक कार्य बळ देणारे आहे. त्यांच्या नावाचा पहिलाच पुरस्कार हे आपल्यासाठी भाग्याचे आहे.”
दरम्यान कॅन्सर रुग्णांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी सालाबाद प्रमाणे कॅन्सरमधून बरे झालेल्या रुग्णांचा मेळावा व कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचा ११ वा वर्धापन दिन असा संयुक्त कार्यक्रम झाला. यावेळी कोल्हापूर कॅन्सर सेन्टरचा या वर्षीचा "एम्प्लॉयी ऑफ द इयर २०२३ " पुरस्कार मार्केटिंग ऍडवायजर डॉ.संभाजी पाटील याना देण्यात आला. केएमएचे अध्यक्ष डॉ किरण दोशी,जीपीए अध्यक्ष डॉ.राजेश सातपुते, मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, सिंधी समाजाचे अध्यक्ष ब्रिजलाल लालवाणी, रोटरी करवीरचे अध्यक्ष उदय पाटील उपस्थित होते.