सौरघट संशोधनात प्र-कुलगुरू पी.एस. पाटील देशात दुसरे, भारतीय संशोधकांच्या ‘टॉप-५००’मध्ये विद्यापीठातील सात संशोधक
schedule10 Jul 21 person by visibility 353 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर :फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट संशोधनाच्या क्षेत्रात येथील शिवाजी विद्यापीठातील ज्येष्ठ संशोधक, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील हे जागतिक संशोधकांच्या यादीत ‘टॉप-१५०’मध्ये तर देशात दुसऱ्या स्थानी झळकले आहेत. त्याचप्रमाणे या क्षेत्रातील त्यांचे संशोधनपर लेखन देशात सर्वाधिक वाचले गेले आहे. त्यांच्या संशोधनाला ३७०८ इतक्या व्ह्यूज प्राप्त झाल्या आहेत. नुकत्याच जाहीर झालेल्या ‘एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा- २०१६-२०२१’मधून त्यांचे हे स्थान अधोरेखित झाले आहे.
डॉ. पी.एस. पाटील यांची मटेरिअल सायन्स, नॅनोसायन्स, फोटोकॅटॅलिसिस, सोलर सेल डेव्हलपमेंट आदी क्षेत्रांतील संशोधनासाठी जगभरातील आघाडीच्या संशोधकांमध्ये गणना होते. काही काळापूर्वीच जाहीर झालेल्या ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या २ टक्के संशोधकांमध्येही त्यांचे नाव आघाडीवर होतेच. त्याचप्रमाणे ‘वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग’मध्येही डॉ. पाटील यांचे नाव अग्रस्थानी होते. नुकताच सन २०१६ ते २०२१ या कालावधीतील ‘स्कोपस’ डाटाच्या आधारे केवळ फोटोकॅटॅलिसिस व सोलर सेल क्षेत्रात कार्य करणाऱ्या जगभरातील आघाडीच्या ५०० संशोधकांचा समावेश असणारा ‘एल्सव्हिअर-सायव्हॅल डेटा’ जाहीर करण्यात आला. या यादीमध्ये डॉ. पी.एस. पाटील हे १४७ व्या स्थानी आहेत.
भारतीय संशोधकांच्या ‘टॉप-५००’च्या यादीमध्ये शिवाजी विद्यापीठातील अन्य सात संशोधकांनाही स्थान प्राप्त झाले आहे. यामध्ये डॉ. व्ही.एल. पाटील, डॉ. एस.डी. डेळेकर, डॉ. के.एम. गरडकर, डॉ. के. वाय. राजपुरे, डॉ. ए.जी. दोड्डमणी, डॉ. ए.व्ही. मोहोळकर आणि डॉ. एन.एल. तरवाळ यांचा समावेश आहे.
.............
‘गेल्या अनेक वर्षांत शिवाजी विद्यापीठ हे फोटोकॅटॅलिसीस आणि सौरघट या क्षेत्रांमध्ये भरीव संशोधन करीत आहे. या संशोधन क्षेत्रात आपण सातत्याने आघाडी टिकवून आहोत. या पुढील काळातही व्यक्तीगत स्तरावर तसेच संशोधक विद्यार्थ्यांच्या माध्यमातून ही संशोधन परंपरा अखंडित पुढे चालवित राहणे महत्त्वाचे आहे. केवळ विद्यापीठातीलच नव्हे, तर जगभरात पसरलेले शिवाजी विद्यापीठाचे विद्यार्थी सुद्धा संशोधनाच्या विविध क्षेत्रांत योगदान देत आहेत.’
डॉ. पी. एस. पाटील, प्र-कुलगुरू
.....................................................
विद्यापीठासाठी गौरवास्पद बाब
‘ प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांची संशोधन क्षेत्रातील कामगिरी ही सातत्याने चमकदार राहिली आहे. त्यामुळे त्यांचे कार्य हे अभिनंदनीय स्वरुपाचे आहेच. त्यांच्या बरोबरीने विद्यापीठाच्या अन्य सात संशोधकांनीही देशातल्या आघाडीच्या ५०० संशोधकांत स्थान मिळविले, यातूनही विद्यापीठातील संशोधनाचा दर्जा सिद्ध होतो. त्यांची कामगिरी निश्चितच गौरवास्पद आहे. या संशोधकांसह समस्त संशोधक, विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधकीय कारकीर्दीत सातत्य राखून असे अनेक मानसन्मान प्राप्त करावेत, आपले स्थान उंचावत राहावे. त्यासाठी विद्यापीठ त्यांना सर्वोतोपरी सहकार्य करील.’
डॉ. डी. टी. शिर्के, कुलगुरू शिवाजी विद्यापीठ
.....................