डाॅ.दिग्विजय पवार यांचा मलेशियात पुरस्काराने गौरव
schedule12 Nov 26 person by visibility 44 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन, कोल्हापूर: शैक्षणिक गुणवत्ता, संशोधन, नवोपक्रम आणि शैक्षणिक नेतृत्वाच्या क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाबद्दल अशोकराव माने ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स येथील इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागप्रमुख आणि जनसंपर्क अधिकारी प्रा. डॉ. दिग्विजय जोतीराम पवार यांना मलेशियामध्ये युनिव्हर्सिटी क्वालालंपूरच्या वतीने ‘आउटस्टँडिंग अकॅडेमिशियन अवॉर्ड २०२६’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याचबरोबर मलेशियातील लिंकन युनिव्हर्सिटी कॉलेजमध्ये पदव्युत्तर संशोधन सहमार्गदर्शक म्हणून त्यांची नियुक्ती झाली आहे.
मलेशियातील मेलाका येथे युनिव्हर्सिटी क्वालालंपूरच्या मलेशियन इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल अँड बायोइंजिनिअरिंग टेक्नॉलॉजी येथे आयोजित ‘इंटरनॅशनल कॉन्फरन्स ऑन एसडीजी-ड्रिव्हन इनोव्हेशन अँड एक्सलन्स अवॉर्ड्स २०२६’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉ. पवार यांना शैक्षणिक क्षेत्रातील उत्कृष्ट योगदानासाठी हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. युनिव्हर्सिटी क्वालालंपूरच्या कॅम्पस प्रमुख, अधिष्ठाता डॉ. नूर आयना बिन्ती मोहम्मद नाझरी यांच्या हस्ते त्यांना सन्मानचिन्ह व आंतरराष्ट्रीय पुरस्कार प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. या परिषदेचे सहआयोजक पुण्यातील ऑल इंडिया श्री शिवाजी मेमोरियल सोसायटीच्या इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. प्रदीप माने हे प्रमुख उपस्थित होते. डॉ. पवार यांना १७ वर्षांचा अध्यापन व शैक्षणिक प्रशासनाचा अनुभव आहे. त्यांनी शिवाजी विद्यापीठातून इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकीमध्ये पीएच.डी. पदवी प्राप्त केली आहे.