शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला नोबेल विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी
schedule13 Nov 26 person by visibility 15 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी: शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र अधिविभागातील पीएच.डी. संशोधक विद्यार्थिनी तब्बू शेख हिला नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांशी थेट संवाद साधण्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठेची संधी मिळाली आहे. येत्या फेब्रुवारीत जपानमध्ये आयोजित १८ व्या ‘होप मीटिंग’ साठी देशभरातून निवडलेल्या अवघ्या नऊ विद्यार्थ्यांमध्ये त्यांचा समावेश केला आहे. विशेष म्हणजे, शिवाजी विद्यापीठातून या प्रतिष्ठेच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमासाठी निवड होणाऱ्या तब्बू पहिलीच विद्यार्थिनी आहे.
जपान सोसायटी फॉर द प्रमोशन ऑफ सायन्सतर्फे २८ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२७ या कालावधीत योकोहामा येथे होप परिषद आयोजित केली आहे. आशियाई देशांमधील तसेच अन्य पात्र प्रदेशांतील युवा संशोधकांना नोबेल पुरस्कार विजेते आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची, संशोधनविषयक विचारांची देवाणघेवाण करण्याची आणि विज्ञान-तंत्रज्ञानातील अत्याधुनिक संशोधनाची ओळख करून घेण्याची संधी या उपक्रमातून मिळते.
युवा संशोधकांची गुणवत्ता अधोरेखित
“शिवाजी विद्यापीठाच्या विद्यार्थिनीला नोबेल पुरस्कार विजेत्या शास्त्रज्ञांशी संवाद साधण्याची संधी मिळणे, ही विद्यापीठासाठी अत्यंत अभिमानाची आणि गौरवाची बाब आहे. त्यांच्या या निवडीमुळे विद्यापीठातील संशोधक विद्यार्थ्यांना जागतिक स्तरावर संशोधन करण्याची आणि मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा मिळेल. विद्यापीठातील संशोधनाची गुणवत्ता आणि युवा संशोधकांची क्षमता यातून अधोरेखित झाली आहे.” अशा शब्दांत कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांनी तब्बू शेख यांचे अभिनंदन केले आहे. प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव, कुलसचिव डॉ. विलास शिंदे, रसायनशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. संजय चव्हाण यांनी तब्बू शेखचे अभिनंदन केले.