‘महाराष्ट्र न्यूज वन’चा इम्पॅक्ट ! एनपीएससंबंधी महापालिका अधिकाऱ्यांची आज बैठक !!
schedule24 Aug 22 person by visibility 508 categoryमहानगरपालिका
समितीच्या बैठकीअभावी धोरण अनिश्चत, महाराष्ट्र न्यूज वन’ने वेधले होते लक्ष
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस) लागू करण्यासंबंधी कोल्हापूर महापालिका प्रशासकीय पातळीवर सुरू असलेल्या दफ्तर दिरंगाईवर ‘महाराष्ट्र न्यूज वन’ने वृत्त प्रसिद्ध केल्यानंतर अधिकाऱ्यांच्या हालचाली वेगावल्या. राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना लागू करण्यासंबंधी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपायुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, मुख्य लेखापाल सुनील काटे, मुख्य लेखापरीक्षक मिलिंद कुलकर्णी यांच्यासह वेगवेगळया विभागाच्या अधिकाऱ्यांची बुधवारी (ता.२४ ऑगस्ट ) महापालिकेत बैठक होत आहे.
महापालिकेतील विविध विभागासह शिक्षण समितीतील मिळून तब्बल दोन हजाराहून अधिक कर्मचाऱ्यांना या योजनेचा लाभ होउ शकतो. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने महापालिकेला यासंबंधी आदेश दिले होते.
फेब्रुवारी २०२२ मध्ये सुधारित आदेश प्राप्त झाल्यानंतर महापालिका स्तरावर अधिकाऱ्यांची समिती स्थापन झाली होती. मात्र या समितीची बैठक होउ न शकल्यामुळे एनपीएस संबंधी धोरण ठरले नाही. यामुळे २००५ नंतर नोकरीत रुजू झालेले दोन हजारहून अधिक कर्मचारी विमा संरक्षण, वैद्यकीय सुविधेपासून वंचित आहेत. संभाजीनगर महापालिकेने ही योजना लागू केली. मात्र कोल्हापूर महापालिका स्तरावर हालचाली दिसत नव्हत्या. या पार्श्वभूमीवर ‘महाराष्ट्र न्यूज वन’ने २२ ऑगस्ट रोजी ‘संभाजीनगर महापालिकेने केले ते कोल्हापूरला जमेना ! अधिकाऱ्यांच्या समितीला वेळ मिळेना !! ’ या मथळयाखाली बातमी प्रसिद्ध केली होती. त्या वृत्ताची दखल घेत महापालिका अधिकाऱ्यांची बुधवारी, २४ ऑगस्ट रोजी बैठक होत आहे. या बैठकीत एनपीएस लागू करण्यासंबंधी धोरण ठरण्याची शक्यता आहे.