कोल्हापूर जिल्ह्याला पर्यटन हब म्हणून दर्जा द्या : राजेश क्षीरसागरांची मुख्यमंत्र्यांच्याकडे मागणी
schedule25 Jan 26 person by visibility 20 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी पर्यटनाचे महत्त्व अधोरेखित करणे आणि जागतिक समुदायामध्ये भारतीय पर्यटनाला चालना देण्यासाठी राष्ट्रीय पर्यटन दिन २५ जानेवारी रोजी साजरा करण्यात येतो. कोल्हापूर जिल्हा हा ऐतिहासिक, धार्मिक, नैसर्गिक, सांस्कृतिक पर्यटनासह उद्योजक आणि व्यापार पर्यटनाची मोठी क्षमता असणारा जिल्हा आहे. गेल्या अनेक वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात देशविदेशातील पर्यटकांच्या संख्येत लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला "पर्यटन हब" म्हणून अधिकृत दर्जा द्यावा, अशी मागणी राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. मागणीचे निवेदन त्यांनी ई- मेल द्वारे मुख्यमंत्री फडणवीस यांना पाठविले आहे.गणेशोत्सव, नवरात्रोत्सव अशा धार्मिक सणांसह साप्ताहिक, वार्षिक सुट्ट्यांच्या दिवशीही कोल्हापुरात पर्यटकांची प्रचंड गर्दी पहायला मिळते. एकंदरीत कोल्हापूर जिल्हा एकप्रकारे "पर्यटन हब" च्या दृष्टीने वाटचाल करत आहे. कोल्हापूर जिल्ह्याला "पर्यटन हब" म्हणून अधिकृत दर्जा मिळाल्यास कोल्हापूर हे पश्चिम व दक्षिण महाराष्ट्रातील सर्वात मोठे आर्थिक केंद्र म्हणून उदयाला येऊ शकते. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्याला "पर्यटन हब" म्हणून अधिकृत दर्जा देणेबाबतची मागणी समस्त कोल्हापूरवासियांकडून केली जात आहे. कोल्हापूरमध्ये ऐतिहासिक, धार्मिक आणि नैसर्गिक पर्यटनाची मोठी क्षमता आहे. असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे.