आरोग्य विज्ञान विद्यापीठाकडून डॉ. रविकुमार जाधव जीवनगौरव पुरस्कारांनी सन्मानित
schedule03 Jul 25 person by visibility 24 categoryआरोग्य

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : जेष्ठ होमिओपॅथिकतज्ज्ञ डॉ. रविकुमार गजानन जाधव यांना महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्यावतीने जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. नाशिक येथे आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २७ वा वर्धापनाच्या निमित्ताने खासदार डॉ. अजित गोपछडे व कुलगुरू लेफ्टनंट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांचे हस्ते या विद्यापीठाच्या सर्वोच्च पुरस्काराने त्यांना गौरविणेत आले. महाराष्ट्र राज्यामध्ये आधुनिक वैद्यक व भारतीय वैद्यक पध्दती यामध्ये यथायोग्य आणि पध्दतशीर शिक्षण, अध्यापन, प्रशिक्षण व संशोधन होत आहे हे सुनिश्चित करणे व अध्यापन संशोधन, विस्तार व सेवा याव्दारे ज्ञान व बुध्दीमत्ता याचा प्रसार, निर्मिती व जपवणुक करणे व परिणामकारक प्रात्यक्षिकाव्दारे आणि आपल्या सामुहिक जीवनाव्दारे समाज जीवनावर प्रभाव पाडणाच्या उद्दीष्टासाठी या क्षेत्रामध्ये उत्कृष्ट काम केल्याबद्दल महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठातर्फे जीवनगौरव पुरस्कार जाधव यांना देण्यात आला. डॉ. रविकुमार जाधव जगद्गुरू पंचाचार्य होमिओपॅथी वैद्यकिय महाविद्यालय व रुग्णालयात मानद प्राध्यापक म्हणून सध्या कार्यरत आहेत. याच महाविद्यालयात ४० वर्षे प्राध्यापक म्हणून सेवा दिली आहे. आजपर्यंत त्यांना महाराष्ट्र होमिओपॅथी परिषद मुंबई यांनी हनिमन जीवन गौरव पुरस्कार व डॉ. बी. के. बोस पुरस्काराने सन्मानित केले आहे. या समारंभास विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. मिलींद निकुंभ, व्यवस्थापन समितीचे सदस्य डॉ. राजकुमार पाटील, डॉ. विलास वांगिकर, कुलसचिव डॉ. राजेंद्र बंगाळ, परिक्षा नियंत्रक डॉ. संदिप कडू, डॉ. देवेंद्र पाटील, वित्त अधिकारी सोनकांबळे कर्मचारी उपस्थित होते.