कोल्हापुरात गुरुवारपासून दररोज पाणी पुरवठा
schedule12 Aug 26 person by visibility 19 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : काळम्मावाडी धरण ९५ टक्के भरले असून, कोल्हापूर महानगरपालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत थेट पाईपलाईन योजनेतून पाणी उपसा नियमित सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे शहरात सध्या सुरू असलेला एक दिवस आड पाणी पुरवठा बंद करून गुरुवारपासून ( १३ ऑगस्ट २०२६) शहरासह संलग्न उपनगरे व ग्रामीण भागातील नळ कनेक्शनधारकांना दररोज नियमित पाणी पुरवठा करण्याचे नियोजन केले आहे. सध्या पावसामुळे नदीपात्रातील पाण्याची गढूळता वाढली आहे. नदीपात्रातून उपलब्ध होणाऱ्या पाण्यावर जलशुद्धीकरण केंद्रामध्ये आवश्यकतेनुसार क्लोरिन व अॅलमचे योग्य प्रमाणात डोस देऊन पाणी शुद्धीकरणाची प्रक्रिया करण्यात येत आहे. नागरिकांना सुरक्षित व शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्यासाठी महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागामार्फत आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. तरी खबरदारीचा उपाय म्हणून नागरिकांनी पिण्याचे पाणी उकळून व गाळून वापरावे. तसेच दररोज नियमित पाणी पुरवठा सुरू झाल्यानंतरही उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करून पाण्याचा अपव्यय टाळावा आणि महापालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे.