गोकुळसाठी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान, दहा तालुक्यात शंभर टक्के मतदान
schedule18 Oct 26 person by visibility 90 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर राजकीय नेत्यांचा सहभाग, आरोप प्रत्यारोप, सभासदांना सहलीवर पाठविणे यामुळे प्रचंड गाजलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी रविवारी चुरशीने ९९.९६ टक्के मतदान झाले. एकूण पाच हजार ४१८ ठरावधारक मतदारांपैकी ५४१६ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. करवीर, कागल, राधानगरी, भुदरगड, पन्हाळा, चंदगड, गगनबावडा, शिरोळ, हातकणंगले, शाहूवाडी तालुक्यात शंभर टक्के मतदान झाले. २५ जागेसाठी ५० उमेदवार रिंगणात आहेत. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढत झाली.
महायुतीकडून मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, जनसुराज्य शक्ती पक्षाचे नेते व आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर, आमदार अमल महाडिक, आमदार शिवाजीराव पाटील यांनी महायुती म्हणून निवडणूक लढविली. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली समविचारी आघाडीमार्फत ही निवडणूक लढविली गेली. समविचारी आघाडीत स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी कामगार पक्ष, शिवसेना ठाकरे पक्षाला प्रत्येकी एक जागा देण्यात आली होती. आमदार पाटील यांच्यासह स्वाभिमानीचे नेते राजू शेट्टी, शिवसेनेचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्यासाठीही निवडणूक प्रतिष्ठेची ठरली आहे. रविवारी सकाळी आठ ते सायंकाळी पाच या वेळेत मतदान झाले. जिल्ह्यातील ३५ मतदान केंद्रावर मतदानाची सुविधा होती. सकाळपासूनच मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. महायुतीकडून कपबशी चिन्हाच्या टोप्या तर समविचारी आघाडीकडून शिट्टी चिन्हाच्या टोप्या परिधान करुन ठरावधारक मतदान केंद्रापर्यंत आले.
करवीर, कागल, राधानगरी, पन्हाळा, चंदगड, गगनबावडा, शिरोळ या तालुक्यात शंभर टक्के मतदान झाले. कागल तालुक्यात ६१९ मतदार संख्या असून साऱ्यांनी मतदानाचा हक्क बजावला. करवीर तालुक्यात सर्वाधिक ८६५ ठरावधारक मतदार आहेत. या साऱ्या मतदारांनी मतदान केल्यामुळे करवीरमध्ये शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. गगनबावडयातील १३१ पैकी १३१ मतदारांनी मतदान केले. चंदगड तालुक्यातील मतदारांची संख्या ४२३ इतकी असून येथेही शंभर टक्के मतदान झाले. पन्हाळयातही शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. ५१३ मतदारांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. राधानगरी तालुक्यात ६९९ मतदार असून येथेही शंभर टक्के मतदान झाले. शिरोळ तालुक्यात २७० पैकी २७० मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामुळे येथेही मतदान शंभर टक्के झाले.
आजरा तालुक्यातील मतदारांची संख्या ३०५ इतकी असून ३०४ एवढ्या मतदारांनी मतदान केले.गडहिंग्लज तालुक्यातही ३९९ मतदारापैकी इतके ३९८ इतके मतदान झाले. भुदरगडमध्ये ५९३ मतदारापैकी ५९३ मतदारांनी मतदान केल्यामुळे शंभर टक्के मतदानाची नोंद झाली. असून एवढया जणांनी मतदान केले. शाहूवाडी तालुक्यात ४४० मतदारापैकी ४४० इतक्या मतदारांनी मतदान केले.हातकणंगले तालुक्यात १६१ पैकी १६१ मतदान झाल्याने शंभर टक्के मतदानाची नोंद झाली.