कोल्हापुरात महायुतीचं सेलिब्रेशन…! कोल्हापुरी फेटा, नगसेवकांचा सत्कार अन् केक कापून आनंदोत्सव ! !
schedule17 Jan 26 person by visibility 112 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिका निवडणूक जिंकण्याचे अनेक वर्षाचे साकार झालेले स्वप्न…पूर्ण बहुमत मिळाल्यामुळे द्विगुणित झालेला आनंद…तब्बल ४५ उमेदवारांनी उधळलेला विजयाचा गुलाल…अन् हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी जमलेले सगळे नेते मंडळी, पदाधिकारी आणि नूतन नगरसेवक…! सोबतीला हलगीचा कडकडाट…शुभेच्छांचा वर्षाव, कोल्हापुरी फेटा बांधत विजेत्यांचा सत्कार आणि केक कापून साजरा केलेला आनंदोत्सव…हे चित्र कोल्हापुरात महायुतीच्या सेलिब्रेशनचे.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीचा निकाल १६ जानेवारी २०२६ रोजी जाहीर झाला. अटीतटीच्या लढतीत भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाने ४५ जागा जिंकत महापालिकेवर महायुतीचा भगवा फडकाविला. महापालिकेवर महायुतीचा झेंडा फडकल्यानंतर दुसऱ्याच दिवशी हॉटेल पॅव्हेलियन येथे विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सकाळी ११ वाजल्यापासून महायुतीचे पदाधिकारी, नतून नगरसेवक येथे दाखल होण्यास सुरुवात झाली. एकमेकांवर शुभेच्छांचा वर्षाव….गळाभेट करत विजयाचे क्षण साजरा होऊ लागले. नूतन नगरसेवक प्रत्येकाला अभिवादन करत होते. वाकून नमस्कार करत निवडणुकीतील मदतीबद्दल कृतज्ञता व्यक्त करत होते. विजयी उमेदवारांना फेटा बांधूनच सभागृहात सोडले जाई.
मुख्य सत्काराचा समारंभ दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास सुरू झाला. वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, खासदार धनंजय महाडिक, राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष व आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी महापौर सुनील कदम, निवडणूक समन्यवक जयंत पाटील, शिवसेनेचे जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम, भाजपाचे प्रदेश सचिव महेश जाधव, महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, रत्नेश शिरोळकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास, नूतन नगरसेवक शारंगधर देशमुख, ऋतुराज क्षीरसागर, उद्योजक व नूतन नगरसेवक सत्यजीत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये विजेत्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला. दरम्यान याप्रसंगी माजी नगरसेवक प्रकाश नाईकनवरे, राहुल चिकोडे यांनी नेतेमंडळीची भेट घेतली.
मंत्री मुश्रीफ, पालकमंत्री आबिटकर, खासदार महाडिक, आमदार क्षीरसागर, प्रदेश सचिव जाधव यांनी नूतन नगरसेवकांना मार्गदर्शन केले. याप्रसंगी बोलताना साऱ्याच नेत्यांनी, ‘नागरिकांनी ज्या विश्वासाने निवडून दिले आहे, तो विश्वास सार्थ ठरवू. प्रत्येकाने नागरिकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यासाठी काम करावे. कोल्हापूरच्या हद्दवाढीसंदर्भातील आनंदाची बातमी लवकरच कळेल. शिवाय विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही.’ असे आश्वस्त केले.
खासदार महाडिक यांनी, ‘शहराच्या सर्वांगिण विकासासाठी ’कोल्हापूर डेव्हलपमेंट अॅक्शन कमिटी’स्थापन करण्यात येणार आहे. यामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांचा समावेश असेल. साऱ्यांच्या योग्य सूचना, प्रस्ताव विचारात घेऊन शहराचा शाश्वत विकास साधू.’असे सांगितले.खासदार महाडिक यांचा पंधरा जानेवारी रोजी वाढदिवस होता. त्यादिवशी त्यांनी, महापालिका निवडणूक जिंकल्यानंतर महायुतीच्या नगरसेवकांसोबत केक कापून वाढदिवस साजरा करू असे सांगितले. त्यानुसार या विशेष कार्यक्रमात खासदार महाडिक यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून केक कापून निवडणुकीतील विजयोत्सव साजरा केला.
................
महायुतीचे ४५ नगरसेवक….
या कार्यक्रमात नूतन नगरसेवक वैभव माने, अर्चना उमेश पागर, प्राजक्ता अभिषेक जाधव, स्वरुप सुनील कदम, प्रमोद भगवान देसाई, राजनंदा तानाजी कदम, वंदना विश्वजीत मोहिते, विजेंद्र विश्वास माने, पल्लवी निलेश देसाई, शिला अशोक सोनुले, दीपा दीपक काटकर, माधवी प्रकाश गवंडी, विशाल शिराळे, ऋतुराज क्षीरसागर, दीपा अजित ठाणेकर, मंगला साळोखे, अनुराधा सचिन खेडकर, शारंगधर देशमुख, विजयसिंह देसाई, माधवी मानसिंग पाटील, संगीता संजय सावंत, अजय इंगवले, अर्चना उत्तम कोराणे, पूर्वा राणे, निलांबरी साळोखे, सत्यजीत जाधव, माधुरी किरण नकाते, आश्किन आजरेकर, आदिल फरास, माधुरी शशिकांत व्हटकर,रेखा रामचंद्र उगवे, नियाज खान, नीलिमा शैलेश पाटील, पूजा पोवार, मुरलीधर जाधव, कौसर बागवान, रुपाराणी निकम, बबन मोकाशी, विजय खाडे, मानसी सतीश लोळगे, सुरेखा सुनील ओटवकर, वैभव अविनाश कुंभार, नेहा अभय तेंडूलकर, अभिजीत शामराव खतकर यांचा सत्कार करण्यात आला.