कोल्हापूर महापालिकेसाठी सुमारे 70 टक्के मतदान
schedule15 Jan 26 person by visibility 192 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : आरोप-प्रत्यारोपांनी गाजलेल्या सभा, गल्लीबोळातील पदयात्रा, राजकीय नेत्यांच्या सहभागाने पणाला लागलेली प्रतिष्ठा…आणि कार्यकर्त्यांमधील टोकाची ईर्षायामुळे रंगतदार बनलेल्या कोल्हापूर महापालिका निवडणुकीतील चुरस रविवारी, पंधरा जानेवारी २०२६ प्रत्यक्ष मतदानादिवशी आणखी वाढली. शहरातील २० प्रभागात सकाळपासूनच मतदारांचा उत्साह दिसत होता. काही मतदान केंद्रावर तर सायंकाळपर्यंत रांगा लागल्या होत्या. महापालिकेसाठी सुमारे 70 टक्के मतदान झाले. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट लढतीची शक्यता असताना राजर्षी शाहू आघाडी, जनसुराज्य शक्ती पक्ष मैदानात उतरले. ८१ जगांसाठी ३२७ उमेदवारांत कोण - कोण बाजी मारणार? याविषयी उत्कंठा वाढली आहे. दरम्यान राजेंद्रनगर येथील मतदान केंद्र व कॉमर्स कॉलेज येथील मतदान केंद्रावर किरकोळ वादावादीचे प्रसंग घडले.
एकूण चार लाख ९४ हजार ७११ मतदारांपैकी इतक्या मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी साडे सात वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात झाली. चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे मतदारांना चार उमेदवारांना मतदान करण्याची संधी मिळाल्यामुळे एक वेगळी उत्सुकता होती. पहिल्यांदाच चार सदस्यीय प्रभाग रचनेसाठी मतदान होत असल्यामुळे काही मतदान केंद्रावर मतदार गोंधळल्यासारखी स्थिती होती. सकाळी साडेसात ते साडेनऊ या वेळेत ९.६४ टक्के मतदान झाले. शहरातील प्रत्येक प्रभागात चुरस पाहावयास मिळत होती.
कसबा बावडा, कदमवाडी, भोसलेवाडी, सदर बाजार, ताराबाई पार्क, नागाळा पार्क, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, शिवाजी पेठ, मंगळवार पेठ, राजारामपुरी, लक्षतीर्थ वसाहत, फुलेवाडी, सानेगुरुजी वसाहत, साळोखेनगर, संभाजीनगर, रामानंदनगर-जरगनगर, टेंबलाईवाडी, विक्रमनगर अशा विविध भागात मतदारांच्या रांगा दिसत होत्या. काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या डोक्यावर पांढऱ्या टोप्या होत्या. तर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. प्रभाग क्रमांकमध्ये मतदानाची टक्केवारी पहिल्यापासून जास्त राहिलीय.
सकाळी ९.३० ते ११.३० या वेळेत मतदानाचा टक्का वाढला. या दोन तासाच्या कालावधीत जवळपास तेरा टक्के मतदान झाले. साडेअकरा ते दुपारी दीड या वेळेत पंधरा टक्के मतदान झाले. सकाळी साडेसात ते दुपारी दीड वाजेपर्यंत एकूण मतदान ३७ टक्क्यापर्यंत पोहोचले. तर दुपारी साडेतीन वाजता मतदानाचा टक्का पन्नास टक्क्यावर पोहोचला. सायंकाळी चार नंतर पुन्हा एकदा मतदान केंद्रावर रांगा वाढल्या.
या निवडणुकीत भाजप, शिवसेना व र ाष्ट्रवादी अजित पवार पक्ष हे महायुती म्हणून एकत्र लढले. काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे पक्षाने ही निवडणूक एकत्रित लढली. तर वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष, आम आदमी पक्ष यांनी राजर्षी शाहू आघाडी स्थापन केली. जनसुराज्य शक्ती पक्षानेही अंतिम टप्प्यात महापालिका आखाडयात उडी घेत हवा निर्माण करण्याचा प्रयत्न केला.