बहुमताच्या जोरावर राजोपाध्येनगरमधील सव्वा एकर जागा खासगी संस्थेला, महापालिकेत सत्ताधारी- विरोधक आमनेसामने ! पाणीपट्टी दरवाढ लांबणीवर ! !
schedule20 Jul 26 person by visibility 57 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर महापालिकेच्या सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत पाणीपटटी दरवाढीला ठराव सभागृहाने प्रलंबित ठेवला. शहराला अगोदर पाणी पुरवठा सुरळीतपणे करा, त्यानंतर दरवाढीचा प्रस्ताव आणा असे खडसावत नगरसेवकांनी हा विषय पुढील मिटींग केला. दरम्यान राजोपाध्येनगरमधील महापालिकेच्या मालकीच्या सव्वा एकर जागा दहा वर्षासाठी भाडेतत्वावर देण्याच्या ठरावावरुन सभागृहात सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने उभे ठाकले. या ठरावाला विरोधी आघाडीच्या सदस्यांनी विरोध केल्यानंतर मतदानावर निर्णय झाला. सत्ताधारी आघाडीच्या ४३ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले तर ठरावाच्या विरोधात २९ नगरसेवकांनी मतदान केले. या ठरावावरील चर्चेदरम्यान सत्ताधारी व विरोधकांत चांगलेच वाकयुद्ध गाजले. महापौर रुपाराणी निकम सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.
सांस्कृतिक केंद्र व वाचनालय याकरिता आरक्षित ४०६७ चौरस मीटर जागा एका खासगी संस्थेला सांस्कृतिक भवन उभारणीसाठी दहा वर्षे भाडेतत्वावर देणे व त्यासाठी प्रती चौरस मीटर ४८ रुपये भाडे आकारणी असा प्रस्ताव इस्टेट विभागाने मांडला होता. या प्रस्तावाला काँग्रेस आघाडीच्या सदस्यांनी विरोध केला. नगरसेवक सुनील मोदी यांनी महापालिकेच्या मालकीची जागा भाडेकराराने देणे अयोग्य आहे यामुळे हा प्रस्ताव मंजूर करू नये. मुळात ज्या कंपनीला ही जागा दिली जाणार आहे त्याचे ऑडिट नाही, नोंदणी नाही. त्या पत्राची आवक जावक नोंद नाही. निविदा प्रक्रिया राबविली नाही. नियमांना डावलून जागा देण्याचा अट्टाहास कशासाठी असा सवाल केला.
त्यावर सत्ताधारी आघाडीतर्फे बाजू मांडताना नगरसेवक प्रा. जयंत पाटील म्हणाले, ‘सगळी प्रक्रिया नियमानुसार आहे. संबंधित संस्थेचे ऑडिट आहे. शिवाय सभेसमोर ऑफिस प्रस्ताव मांडलेला आहे. दहा वर्षासाठी जागा भाडयाने द्यायची आहे. दहा वर्षानंतर त्या जागेवर बांधलेली इमारत विनाअट महापालिकेला मिळणार आहे. शिवाय करार कालावधीत दहा वर्षे महापालिकेला भाडे मिळणार आहे.’असे स्पष्ट केले. त्यावर आयुक्त राजेंद्र भारुड यांनी यासंबंधी कायदेशीर मत विचारुन निर्णय घेऊ असे स्पष्ट केले. त्यावर सत्ताधारी बाजूच्या सदस्यांनी सभागृह ठरावाच्या बाजूने आहे. ठराव मंजूर करा, कायदेशीर मत घ्या आणि जो करार आहे त्याची सभागृहाला माहिती द्या असा आग्रह धरला. सत्ताधाऱ्यांचा हा आग्रह मान्य नसल्याचे विरोधी आघाडीने स्पष्ट करत मतदानाची मागणी केली. हात उंचावून मतदान झाले. बहुमताच्या बळावर सत्ताधाऱ्यांनी ठराव मंजूर केला. या ठरावावरील चर्चेदरम्यान काँग्रेसकडून दुर्वास कदम यांनी सहभाग घेतला. तर महायुतीकडून शारंगधर देशमुख, आश्निक आजरेकर, वैभव माने, विजय खाडे यांनी बाजू लढविली. नियमबाह्य पद्धतीने ठराव मंजूर होऊ नये असे विरोधकांनी डिवचताच यापूर्वी एक रुपया भाडेकराराने कोणाला जागा दिली होती ? त्यावेळी नियमांची आठवण झाली नव्हती का ? अशी विचारणा आश्किन आजरेकर यांनी केला. सत्ताधारी व विरोधकांच्या उलटसुलटत चर्चेतच मतदान होऊन ठराव मंजूर झाला. दरम्यान अतिक्रमण कारवाईवरुन नगरसेवक आदिल फरास यांनी प्रशासनावर हल्लाबोल केला. बायामेट्रिक कार्डधारकांना त्रास देण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही असेही त्यांनी बजावले