बिद्री यंदाही ऊसदरात लय भारी, ऊसाला एकरकमी 3614 रुपये दर
schedule04 Nov 25 person by visibility 49 categoryउद्योग
        महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : कागल तालुक्यातीलबिद्री येथील श्री. दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखान्याने चालू २०२५-२६ या गळीत हंगामासाठी प्रति टन एकरकमी ३६१४ रुपये ऊसदर जाहीर केला आहे. हा दर सध्याच्या बाजारस्थितीत राज्यातील सर्वाधिक दरांपैकी एक ठरत असून, बिद्री कारखान्याची ‘शेतकऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य’ ही परंपरा कायम राखणारा निर्णय ठरला आहे.
कारखाना कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत थेट मुंबईतून चेअरमन के. पी. पाटील सहभागी झाले होते. यावेळी व्हाईस चेअरमन मनोज फराकटे व संचालक मंडळ उपस्थित होते.बिद्री साखर कारखान्याने स्थापनेपासूनच ऊस उत्पादक शेतकऱ्यांशी घट्ट नातं जोडलं आहे. नेहमीच उच्चांकी ऊसदर देण्याची परंपरा कायम ठेवत या वर्षीही कारखान्याने शेतकऱ्यांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत.
ऊसदर जाहीर करताना कारखान्याचे अध्यक्ष, के. पी. पाटील यांनी  मुंबईतुन बोलताना सांगितले की, “बिद्रीने आजवर शेतकऱ्यांच्या विश्वासावर चाललेली प्रगती कायम ठेवली आहे. भविष्यातही बिद्री कोणत्याही परिस्थितीत मागे राहणार नाही.”
अवकाळी पाऊस, उत्पादन खर्चातील वाढ, ऊसतोड मजूर टंचाई अशा आव्हानांनंतरही बिद्रीने शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत दर ठरवला आहे. “शेतकऱ्यांचे पाठबळ हेच बिद्रीचे बलस्थान आहे. याच पाठबळावर बिद्रीची यशस्वी घोडदौड पुढेही सुरू राहील. आमचे उद्दिष्ट केवळ साखर उत्पादन नव्हे, तर शेतकऱ्यांच्या जीवनमानात सुधारणा करणे हे आहे.”कारखान्याचे व्हाईस चेअरमन मनोज फराकटे म्हणाले,  बिद्री साखर कारखान्याने ऊसदरासोबतच कृषी पूरक उपक्रम, शेती सुधारणा योजना आणि ऊस विकास कार्यक्रम राबविण्याचाही संकल्प व्यक्त केला आहे. या निर्णयामुळे बिद्री परिसरातील शेतकऱ्यांमध्ये नव्या ऊर्जेचा संचार झाला असून, कारखान्याविषयीचा विश्वास अधिक दृढ झाला आहे.यावेळी सर्व संचालक, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, कार्यकारी संचालक एस. एन. घोरपडे उपस्थित होते.
ऊसदरात नेहमीच अग्रेसर असलेल्या बिद्री साखर कारखान्याने कष्टकरी ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या श्रमाला योग्य दाम दिला आहे. कारखान्याची उच्चांकी ऊसदराची परंपरा यंदाही कायम राहील असे अभिवचन गळीत हंगामाच्या प्रारंभी दिली होती. त्याची वचनपूर्ती म्हणून यंदाच्या हंगामात गळीताला येणाऱ्या ऊसाला प्रतिटन ३६१४ रुपये एकरकमी दर देणार असल्याची घोषणा कारखान्याचे अध्यक्ष माजी आमदार के. पी. पाटील यांनी केली.