स्मॅकच्या अध्यक्षपदी भरत जाधव, उपाध्यक्षपदी प्रशांत शेळके
schedule04 Nov 26 person by visibility 28 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : शिरोली मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, कोल्हापूर 'स्मॅक' च्या २०२६-२७ या वर्षासाठी अध्यक्षपदी सरोज ग्रुप ऑफ कंपनीजचे भरत बापूसाहेब जाधव, तर उपाध्यक्षपदी उषा एंटरप्रायझेसचे प्रशांत शिवाजीराव शेळके यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. स्मॅक भवन येथील कै. मोहनराव शिरगावकर हॉलमध्ये बुधवारी झालेल्या संचालक मंडळाच्या ३४ व्या मासिक सभेत नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पहिली एमआयडीसी असोसिएशन आणि उद्योगजगताच्या विकासासाठी गेल्या पाच दशकांपासून कार्यरत असलेल्या 'स्मॅक'ने सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्ण केले आहे. उद्योजकांच्या समस्या, औद्योगिक विकास, कामगार कल्याण आणि सामाजिक बांधिलकी जपत संस्थेने आजवर अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम राबविले आहेत.
ऑनररी सेक्रेटरीपदी मिनर्व्हा एंटरप्रायझेसचे शेखर श्रीकांत कुसाळे, तर खजिनदारपदी शुभम टर्निंग सेंटरचे बदाम लक्ष्मण पाटील यांची फेरनिवड करण्यात आली. स्मॅक आयटीआयच्या चेअरमनपदी चौगले सिमेंट पाईप कंपनीचे जयदीप जयसिंगराव चौगले, तर स्मॅक क्लस्टरच्या चेअरमनपदी चौगुले इंडस्ट्रीजचे सुरेश लक्ष्मण चौगुले यांची फेर निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष जयदीप चौगले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या सभेस संचालक सुरेंद्र जैन, राजू पाटील, अतुल पाटील, नीरज झंवर, सचिन पाटील, रणजीत जाधव, सुमंत पाटील आदी उपस्थित होते.