केआयटीच्या २६ विद्यार्थ्यांना टाटा पॉवरमध्ये ७ लाखांचे पॅकेज
schedule15 Oct 26 person by visibility 23 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: भारताच्या ऊर्जा क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी 'टाटा पॉवर' मध्ये येथील नामांकित केआयटी (प्रदत्त स्वायत्त) अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या तब्बल २६ विद्यार्थ्यांची घवघवीत निवड झाली आहे. यामध्ये मेकॅनिकल विभागातील १६ आणि इलेक्ट्रिकल विभागातील १० विद्यार्थ्यांचा समावेश असून, एकूण निवडीमध्ये ७ विद्यार्थिनींनी बाजी मारली आहे. निवड झालेल्या या सर्व विद्यार्थ्यांना कंपनीने वार्षिक ७ लाख रुपयांचे आकर्षक पॅकेज घोषित केले आहे. अंतिम वर्षाच्या पहिल्याच सत्रात राष्ट्रीय स्तरावरील नामांकित कंपनीमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणात प्लेसमेंट मिळवून केआयटीच्या विद्यार्थ्यांनी एक नवा उच्चांक प्रस्थापित केला आहे.
टाटा पॉवर कंपनीने अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित केलेला कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्ह अत्यंत आव्हानात्मक होता. या निवड प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी ॲप्टिट्युड टेस्ट, टेक्निकल इंटरव्यू, एच.आर. इंटरव्यू आणि पर्सनल इंटरव्यू असे कठीण टप्पे यशस्वीपणे पार केले. कॉलेज प्रथम वर्षापासून प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना प्लेसमेंटच्या दृष्टीने विविध प्रकारचे मोफत ट्रेनिंग आयोजित करते.उद्योग विश्वाचा अनुभव असणारे व्यावसायिक तज्ञ या सत्रांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. कॉलेज व विद्यार्थ्यांच्या सातत्यपूर्ण परिश्रमांमुळेच हे मोठे यश विद्यार्थ्यांनी मिळवले आहे, असे प्रतिपादन संस्थेचे संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी केले.
पहिल्याच सत्रात विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या या अभूतपूर्व यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष साजिद हुदली, उपाध्यक्ष सचिन मेनन, सचिव दीपक चौगुले आणि संचालक डॉ. मोहन वनरोट्टी यांनी सर्व विद्यार्थ्यांचे व प्लेसमेंट विभागाचे विशेष अभिनंदन केले. हा मानाचा टप्पा पार पाडण्यासाठी प्लेसमेंट विभागाचे अधिष्ठाता डॉ. अमित सरकार, सह-अधिष्ठाता प्रा. निलेश देसाई तसेच दोन्ही विभागांचे प्लेसमेंट समन्वयक प्रा. आशिष पाटील आणि प्रा. संतोष मडीवाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.