१०० ई - बसेस केएमटीच्या ताफ्यात होणार दाखल-खासदार धनंजय महाडिक
schedule03 Jan 25 person by visibility 233 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : . शहराच्या दळणवळणाला गती देणार्या १०० ई - बसेस केएमटीच्या ताफ्यात लवकरच दाखल होतील. त्यासाठी पायाभूत सुविधा उभारण्याचे काम गतीने होईल, असे खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितले.
कोल्हापूर शहरातील ड्रेनेज, पाणी पुरवठा, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, ई बसेससाठी लागणारे चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाचे काम यासह अमृत योजना आणि डीपी रस्त्याबाबत खासदार महाडिक यांनी महापालिका प्रशासक के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त राहुल रोकडे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, जलअभियंता हर्षजित घाटगे, नगररचना विभागाचे रमेश मस्कर यांच्यासोबत बैठक घेतली. चार्जिंग स्टेशन आणि डेपो विस्तारीकरणाची कामे संथ गतीने सुरू असल्याबद्दल खासदार महाडिक यांनी अधिकार्यांना धारेवर धरले.
कोल्हापूर शहरात नियमित पाणी पुरवठ्यासाठी १२ पैकी ११ टाक्या बांधण्यात आल्या असून, क्रॉस कनेक्शन जोडून लवकरच संपूर्ण शहरात पाणी पुरवठा होईल असे बैठकीत स्पष्ट केले. बैठकीला यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक, माजी नगरसेवक प्रा. जयंत पाटील, रूपाराणी निकम, अजित ठाणेकर, किरण नकाते, माधुरी नकाते, मनिषा कुंभार, राजसिंह शेळके, शेखर कुसाळे, उपशहर अभियंता सुरेश पाटील उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठाच्या हद्दीतून जाणार्या डीपी रस्त्याचे काम २०१६ सालापासून प्रलंबित आहे. रस्त्यासाठी जागा ताब्यात आली हे गृहीत धरून, महापालिकेने बांधकाम परवानगी दिलीय, असे प्रा. जयंत पाटील यांनी सांगितले. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू आणि प्रशासक के.मंजूलक्ष्मी यांनी एकत्रित प्रस्ताव तयार करून, तो जिल्हाधिकार्यांना पाठवावा. त्यानंतर तो ८ दिवसात वरिष्ठ कार्यालयाकडे गेला पाहीजे, असे खासदार महाडिक यांनी सांगितले. शंभर कोटी अनुदानातून मंजूर रस्ते कधी पूर्ण होणार, अशी विचारणा खासदार महाडिक यांनी केली. मार्च अखेरपर्यंत हे रस्ते पूर्ण होतील, असे शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत यांनी सांगितले. हे रस्ते दर्जेदार आणि चांगले झाले पाहीजेत, अशी सूचनाही खासदार महाडिक यांनी केली.
पाणी पुरवठयाचा घोळही मोठया प्रमाणात सुरू आहे, अनेक ठिकाणी पाणी येत नाही, अशी तक्रार प्रा. पाटील यांनी केली. तर वारंवार पाणी पुरवठा खंडित का होतो, अशी विचारणा अजित ठाणेकर यांनी केली. याबाबत जलअभियंता हर्षजित घाटगे यांनी खुलासा केला. जिल्हा नियोजन मंडळातून जिल्हा परिषदेला शाळा आणि दवाखान्यांसाठी निधी मिळतो. तसाच निधी महापालिकेलाही मिळावा, अशी अपेक्षा प्रशासक के. मंजुलक्ष्मी यांनी केली. निधी मिळण्यासाठी प्रयत्न करू, असे आश्वासन खासदार महाडिक यांनी दिले.