अभिनेते मोहन जोशी यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ जाहीर
schedule01 Oct 26 person by visibility 20 categoryलाइफस्टाइल
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेच्यावतीने प्रतिवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ यंदा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटविणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. रविवारी ४ ऑक्टोबर २०२६ रोजी हा पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
मराठी नाट्य आणि चित्रपटसृष्टीमध्ये अनेक दशके आपल्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविणारे मोहन जोशी हे मराठी मनोरंजनविश्वातील एक महत्त्वाचे नाव आहे. रंगभूमीपासून चित्रपटांपर्यंत विविध भूमिकांमधून त्यांनी आपल्या अभिनयाची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांच्या प्रदीर्घ आणि उल्लेखनीय कलाप्रवासाचा गौरव म्हणून त्यांना यंदाचा ‘संगीतसूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.
या पुरस्काराचे स्वरूप रोख रुपये ५१,०००, सन्मानचिन्ह, शाल आणि श्रीफळ असे आहे. या पुरस्कार सोहळ्याचे आणखी एक प्रमुख आकर्षण म्हणजे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी आणि त्यांच्या पत्नी ज्योती मोहन जोशी यांची प्रकट मुलाखत मुलाखतकार राजेश दामले ही मुलाखत घेणार आहेत. या मुलाखतीच्या माध्यमातून मोहन जोशी यांच्या कलाप्रवासातील विविध टप्पे, रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील अनुभव, संस्मरणीय भूमिका, त्यांच्या वैयक्तिक आयुष्यातील आठवणी तसेच त्यांच्या यशस्वी वाटचालीत सौ. ज्योती जोशी यांची लाभलेली साथ अशा विविध पैलूंवर मनमोकळा संवाद रंगणार आहे.हा कार्यक्रम दुपारी ३.३० वाजता गोविंदराव टेंबे रंगमंदिर, गायन समाज देवल क्लब येथे होणार आहे. या कार्यक्रमाला कोल्हापूरमधील नाट्यप्रेमी, रसिक प्रेक्षक, कलावंत आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, कोल्हापूर शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.