हाऊसफुल्ल गर्दीत दालनचा समारोप ! १०० फ्लॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग! लिफ्ट पार्किंगची नोंदणी !!
schedule03 Feb 26 person by visibility 13 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : नागरिकांची हाऊसफुल्ल गर्दी, विविध भागातील गृहप्रकल्पाच्या नोंदणीसाठी होणारी चौकशी, शहर परिसरातील विविध लोकेशन्सला मिळणारी पसंती हे चित्र होते, दालन २०२६ प्रदर्शनाचे. येथील महासैनिक दरबार हॉल येथे ३० जानेवारी दोन फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडलेल्या प्रदर्शनात १०० फलॅट, ५० प्लॉटसाठी बुकिंग झाले. तसेच २०० लिफ्ट पार्किंग व दहा लिफ्टसाठी नोंदणी झाली. क्रीडाई कोल्हापूरतर्फे या प्रदर्शनाचे आयोजन केले होते. या चार दिवसीय प्रदर्शनात लाखो लोकांनी भेट दिली.
जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलिस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता यांच्या उपस्थितीमध्ये सोमवारी, दालन २०२६ प्रदर्शनाचा समारोप झाला. याप्रसंगी बोलताना जिल्हाधिकारीं येडगे यांनी, ‘दालनचे नेटके नियोजन हे अतिशय कौतुकास्पद आहे. या माध्यमातून नागरिकांना आपल्या आवडत्या घरकुलाचे स्पन साकार होण्यास मदत होणार आहे. येत्या आठवडयात बैठक घेऊन क्रीडाईतर्फे बांधकाम क्षेत्रांशी संबंधित ज्या मागण्या केल्या आहेत त्याची सोडवणूक करू. यासाठी क्रीडाईच्या सात जणांची समिती, निवासी उपजिल्हाधिकारी, महसूल विभागाचे तहसिलदारांची संयुक्त बैठक होईल.’ असे सांगितले. तसेच त्यांनी, क्रीडाईच्या संचालक मंडळात महिलांचा समावेश करावा अशी सूचना केली. जिल्हा पोलिस अधीक्षक गुप्ता यांनी, शहर विकासात बांधकाम व्यावसायिक, विकसकांची भूमिका मोठी असते.असे नमूद केले.
क्रीडाई कोल्हापूरचे अध्यक्ष के. पी. खोत यांनी दालन २०२६ प्रदर्शनाचा आढावा घेतला. क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर यांनी वर्ग एक दाखल्याची प्रक्रिया सुटसुटीत करावी. तसेच तुकडाबंदी कायद्यात सुसूत्रता आणावी.’अशी मागणी केली. याप्रसंगी क्रीडाई महाराष्ट्राचे उपाध्यक्ष महेश यादव, क्रीडाई कोल्हापूरचे उपाध्यक्ष प्रकाश देवलापूरकर, चेतन वसा, गणेश सावंत, निखिल शहा, श्रीराम पाटील, अमोल देशपांडे, सागर नलंगा, गौतम परमार, सचिन ओसवाल, श्रीकांत पाटील,संदीप पोवार, रितीक बन्सल आदी उपस्थित होते. क्रीडाईचे पदाधिकारी संग्राम दळवी यांनी आभार मानले.