महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : विधानसभेचे पडघम वाजायला लागल्यानंतर पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे आणि मुश्रीफांनी आता थांबाव, मला संधी द्यावी अशी वक्तव्ये करणारे मंडलिक गटाचे युवा नेते विरेंद्र मंडलिक हे आता महायुतीुचा धर्म पाळत प्रचारात उतरले आहेत. कागल मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या प्रचारार्थ मुरगूड येथे मेळावा झाला. या मेळाव्यात खासदार संजय मंडलिक, वीरेंद्र मंडलिक यांनी भाषण करत मंत्री मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्क्याने निवडून आणू, विरोधी उमेदवाराचे डिपॉझिट जप्त होईल असे सांगितले. मंत्री मुश्रीफ, गोकुळचे संचालक युवराज पाटील आदींच्या उपस्थितीमध्ये हा मेळावा झाला.
या मेळाव्यात वीरेंद्र मंडलिक काय बोलणार याकडे लक्ष होते. कारण त्यांनी यापूर्वी गोकुळमधील पराभव, लोकसभा निवडणुकीतील अपयश यावरुन मंत्री मुश्रीफ यांच्यावर टीका केली होती. शिवाय कागल विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढविणार असल्याचे म्हटले होते. त्यांच्या बंडखोरीच्या भाषणामुळे कागल तालुक्यातील राजकारण ढवळले. दरम्यान बुधवारी, ३० ऑक्टोबर रोजी मुरगूड येथे मेळावा झाला. या मेळाव्याला वीरेंद्र मंडलिक उपस्थित राहिले.
भाषणात वीरेंद्र मंडलिक म्हणाले, ‘पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना एक लाखाहून अधिक मताधिक्याने निवडून आणण्यासाठी जीवाचा रान करू. विकासाचं आणि विचारांचे राजकारण झालं पाहिजे, ही स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांची विचारधारा होती. त्यामुळेच मी या निवडणुकीतून थांबलो आहे.’ माजी खासदार संजय मंडलिक म्हणाले, ‘मंडलिक गट आणि मुश्रीफ गट हे एकच कुटुंब आहे. आमचं आता मनापासून जुळलय. कुटुंबातील वाद आता मिटलाय. महाराष्ट्रात महायुतीचे सरकार सत्तेवर येण्यासाठी जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच उमेदवारांना विजयी करा. यापूर्वी झालं ते झालं यापुढे आपल्याला एकाच मार्गाने जायचे आहे.’
मंत्री मुश्रीफ म्हणाले, ‘मंडलिक व मुश्रीफ हे एकच कुटुंब, आपल्यातील समज - गैरसमज गंगार्पण करू या. स्वर्गीय खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्यामुळेच माझी राजकीय आणि सामाजिक जडणघडण झाली. प्रा संजय मंडलिक यांनी एखाद्या पराभवाने खचून जाऊ नये, त्यांना पुढच्या लोकसभेत खासदार म्हणून निवडून आणणे ही जबाबदारी आमची. ॲड. वीरेंद्र मंडलिक यांचे राजकीय स्वप्न, सामाजिक जीवनातील इच्छा -आकांक्षा यांचा बॅकलॉग भरून काढू.”