महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : करवीर विधानसभा मतदारसंघासाठी महायुतीकडून चंद्रदीप नरके यांनी शक्तीप्रदर्शन करत अर्ज दाखल केला. कार्यकर्त्यांनी, खानविलकर पेट्रोल पंप ते रमण मळा चौक अशी जंगी रॅली काढली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने भगवे वातावरण निर्माण झाले होते. भगव्या टोप्या, स्कार्फ परिधान करुन, विजयाच्या घोषणा देत रॅली काढण्यात आली. धनगरी ढोल, वाद्यांचा गजर यामुळे जल्लोषी वातावरण निर्माण झाले.
नरके यांच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी झालेल्या सभेत खासदार धनंजय महाडिक, माजी खासदार संजय मंडलिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची भाषणे झाली. त्यांनी भाषणात महाविकास आघाडीच्या नेतेमंडळीचा समाचार घेतला. यावेळी शिवसेना शिंदे गटाचे निरीक्षक उदय सावंत,महेश जोगळेकर, शिवसेना जिल्हाप्रमुख राजेखान जमादार, रिपाईचे उत्तम कांबळे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील आसुर्लेकर, वीरेंद्र मंडलिक, पी. जी. शिंदे, जिहा परिषदेचे माजी सदस्य अरुण इंगवले, हंबीरराव पाटील, मधुकर जांभळे, गोकुळचे संचालक अजित नरके, एस. आर पाटील, कुंभीचे उपाध्यक्ष राहुल खाडे, एकनाथ पाटील, देवराज नरके, राजवीर नरके आदी उपस्थित होते.
……………………
“ महायुती सरकारने कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी केली आहे. घरोघरी योजनांचा लाभ दिला. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या निमित्ताने मतदारसंघातील हजारो लोक एकवटले. करवीर तालुक्यात भगवे वादळ निर्माण झाले आहे. या निवडणुकीत जनता मला निवडून देईल याची पूर्ण खात्री आहे. ”
- चंद्रदीप नरके, उमेदवार महायुती करवीर मतदारसंघ