विनय कोरे पाचव्यांदा आमदार, ३६ हजार मताधिक्क्यांनी विजय
schedule24 Nov 24 person by visibility 96 categoryजिल्हा परिषद
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शाहूवाडी-पन्हाळा विधानसभा मतदारसंघावर २०२४ च्या निवडणुकीतही जनसुराज्य शक्ती पक्षाचा झेंडा फडकला. जनसुराज्य शक्ती पक्षाचे संस्थापक विनय कोरे यांनी या मतदारसंघात ३६ हजार ५३ मताधिक्क्यांनी विजय मिळवला. या मतदारसंघात दुरंगी लढत झाली. कोरे यांना एक लाख ३६ हजार ६४ मते मिळाली तर महाविकास आघाडीतंर्गत शिवसेना ठाकरे गटाचे उमेदवार सत्यजित पाटील यांना एक लाख ११ मिळाले. कोरे हे पाचव्यांदा आमदार बनले.
लोकसभा निवडणुकीत सत्यजित पाटील यांना शाहूवाडी-पन्हाळा मतदारसंघात मताधिक्क्य घेतले होते. विधानसभा निवडणुकीतही त्याची पुनरावर्ती होईल अशी त्यांना अपेक्षा होती. मात्र मतदारांनी विनय कोरे यांच्या ‘गाव तिथे विकास’ या सूत्राला साथ दिली. या मतदारसंघात ७९.०२ टक्के मतदान झाले आहे. येथील मतमोजणी २५ फेऱ्यामध्ये झाल्या. येथे २,४१, ९८७ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. शाहूवाडीत चौदा उमेदवार होते.
निकालाचे पारडे पहिल्या फेरीपासून हेलकावत होते. कधी पाटील तर कधी कोरे यांच्या बाजूने मतांचे दान पडत होते. चौदाव्याफेरीपर्यंत दोलायमान स्थिती होती. पंधराव्या फेरीपासून कोरे यांनी निर्णायक आघाडी घेण्यास सुरुवात केली. २५ व्या फेरीपर्यंत आघाडी कायम ठेवत कोरे यांनी बाजी मारली. पाटील यांना शाहूवाडी तालुक्यात मोठे मताधिक्क्य मिळेल अशी अपेक्षा होती. शाहूवाडीत पाटील यांना ६२ हजार ९६२ तर कोरे यांना ६१ हजार ८३१ मते मिळाली. जेमतेम ११३१ मताधिक्क्य पाटील यांना होते.