विद्यापीठातील विभागात पूजाअर्चा, विरोध केल्यानंतर प्रकुलगुरुंची दिलगिरी
schedule03 Dec 25 person by visibility 47 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : खरं तर, सरकारी कार्यालयात पूजापाठ करता येत नाही. त्यासंबंधी राज्य सरकार व जिल्हा प्रशासनाची स्पष्ट नियमावली आहे. शिक्षण संस्थाही या नियमांना अपवाद नाहीत. मात्र शिवाजी विद्यापीठातील एका विभागात पूजाअर्चा करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. या प्रकाराला संविधान सन्मान युवा प्रतिष्ठान संघटनेने आक्षेप नोंदविला. तसेच शिक्षण संस्थेच्या ठिकाणी पूजाअर्चाच्या प्रकाराला विरोध दर्शविला. यासंबंधी अधिकाऱ्यांकडे विचारणा केली. विद्यापीठाच्या प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांनी अनवधानानं हा प्रकार घडल्याचं सांगत दिलगिरी व्यक्त केली. तसेच यापुढे असे प्रकार घडणार नाहीत अशी ग्वाही दिली.
विद्यापीठातील खर्डेकर ग्रंथालयातील दुसऱ्या मजल्यावर एसयूके रिसर्च अँड डेव्हलपमेंट फॉउंडेशन आहे. या सेंटरमध्ये अद्ययावत कप्युटर लॅब आहे. याठिकाणी इनोव्हेशन इन्क्युबेशन अँड लिंकेजेस या विभागा मार्फत नवीन स्टार्टअपसाठी काहींना संधी देण्यात आली.यापैकी स्टार्टअप सुरु करताना लॅब करताना पूजा मांडली. या प्रकाराची माहिती संविधान सन्मान युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष निलेश बनसोडे आणि इतर संविधान प्रेमी यांना कळाली. त्यांनी तत्काळ या ठिकाणी जाऊन विचारणा केली. त्यावेळी कुणालाही सरकारी नियमांबद्दल काहीही माहिती नसल्याचे समोर आले. त्यांनी, सेन्टरचे समन्वयक डॉ. सागर डेळेकर आणि कुलसचिव डॉ. व्ही. एन. शिंदे यांच्याकडे या संदर्भात विचारणा केली. तसेच प्रभारी प्रकुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांची भेट घेतली. त्यांना विद्यापीठात अशा पद्धतीचं कर्मकांड चालतं का ? असा सवाल उपस्थित केला. यावर त्यांनी पूजाअर्चा केल्यासंदर्भात काही कल्पना नाही, मात्र अनवधानाने घडलेल्या या घटनेबद्दल दिलगिरी व्यक्त करत असल्याचे सांगितले. यावेळी शिवराम बुध्याळकर, पंकज आठवले, अमित समुद्रे आदी उपस्थित होते.
यासंबंधी निलेश बनसोडे म्हणाले, ‘छत्रपती शाहू महाराजांच्या नगरीत आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने असणाऱ्या या विद्यापीठात होणारे कर्मकांड निषेधार्ह आहे. संविधानानं प्रत्येकाला धार्मिक स्वातंत्र्य आणि पूजाअर्चा करण्याचं स्वातंत्र्य बहाल केले आहे. पण पूजाअर्चा कुठे करावी, कुठे करू नये याविषयी स्पष्ट नियमावली आहे. भविष्यात शैक्षणिक संस्थेत, विद्यापीठात असे प्रकार घडू नये अशी अपेक्षा आहे.’