टीईटी सक्तीच्या विरोधात पाच डिसेंबरला जिल्ह्यातील शाळा शंभर टक्के बंद, कलेक्टर ऑफिसवर मोर्चा
schedule02 Dec 25 person by visibility 134 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ, जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि सर्व प्राथमिक व माध्यमिकशिक्षक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने टीईटी सक्तीच्या विरोधात शुक्रवारी पाच डिसेंबर 2025 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील शाळा शंभर टक्के बंद ठेवून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चामध्ये हजारो शिक्षक सहभागी होऊन टीईटी सक्तीच्या निर्णयाला विरोध नोंदवणार आहेत अशी माहिती शिक्षक आमदार जयंत आसगावकर, शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एस.डी. लाड, शिक्षक नेते प्रभाकर आरडे, दादासाहेब लाड, भरत रसाळे, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कौस्तुभ गावडे, मुख्याध्यापक संघाचे सचिव आर वाय पाटील यांनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेमध्ये दिली. सकाळी अकरा वाजता दसरा चौक येथून मोर्चाला सुरुवात होणार आहे. या आंदोलनामध्ये जिल्ह्यातील सगळ्या शाळा व शिक्षकांचा सहभाग असणार आहे. खाजगी अनुदानित, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद अशा विविध आस्थापनाच्या शाळा बंद राहणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. दसरा चौक, व्हीनस कॉर्नर, बसंत -बहार टॉकीज मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय असा मोर्चा निघणार आहे. आमदार जयंत आसगावकर म्हणाले , "शिक्षकांच्या न्याय हक्कासाठी हा लढा आहे. टीईटी रद्द करावी म्हणून राज्य सरकारने सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी शिक्षक वर्गातून सातत्याने होत आहे. मात्र सरकार शिक्षकांच्या मागण्यांची दखल घेत नाही असे चित्र आहे. सरकारचे लक्ष वेधण्यासाठी आणि तत्काळ पुनर्विचार याचिका दाखल करावी या मागणीसाठी 5 डिसेंबरचा शाळा बंद आंदोलन पुकारले आहे. शिक्षक नेते प्रभाकर आरडे म्हणाले, " सर्वांना मोफत व सक्तीचे शिक्षण देण्याचे जबाबदारी सरकारची आहे. मात्र सरकारचे धोरणे गोरगरिबांच्या शाळा मोडीत काढण्याचे दिसत आहे. सरकारच्या चुकीच्या शैक्षणिक धोरणाच्या विरोधात ही लढाई आहे." शैक्षणिक व्यासपीठाचे अध्यक्ष एसडी लाड म्हणाले," पाच डिसेंबर रोजी शाळा बंद आंदोलन व जिल्हाधिकारी कार्यालयावरील मोर्चा हा वेतनासाठी नाही तर शिक्षण वाचविण्यासाठी आहे. या आंदोलनात शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन सरकारला न्याय भूमिका घ्यायला भाग पाडावे असे आवाहन केले स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष कौस्तुभ गावडे म्हणाले, "ज्या ज्या वेळी चुकीचे निर्णय झाले; अन्याय झाला त्या त्या वेळी कोल्हापूरने मोठा लढा उभा केला. टीईटी सक्तीचा निर्णय सुद्धा शिक्षकांच्यावर अन्याय करणार आहे. कोल्हापुरातून मोठे आंदोलन करून शिक्षकांना न्याय मिळवून देण्यासाठी सारे प्रयत्न करू." शिक्षक नेते दादासाहेब लाड म्हणाले, "सरकार कोणाचेही असो सरकारी शाळा व शिक्षण मोडीत काढण्याचा खटाटोप सुरू आहे. शिक्षक हा विविध अभ्यासक्रम व परीक्षा देऊन या पदासाठी पात्र ठरला असताना पुन्हा त्यांच्यावर टीईटीची सक्ती कशासाठी ? क्लासवन अधिकारी व आमदार -खासदारांना अशा पद्धतीची परीक्षा का लागू केली जात नाही ?असा सवाल केला. शिक्षक नेते भरत रसाळे म्हणाले," राज्य सरकारच्या चुकीच्या निर्णयामुळे शिक्षकांच्यावरती टीईटी परीक्षेचे भूत मानगुटीवर बसले आहे. सरकारने सुप्रीम कोर्टात तत्काळ पुनर्विचार याचिका दाखल करावी अशी मागणी त्यांनी केली. मुख्याध्यापक संघाचे सचिव आर. वाय. पाटील म्हणाले," पाच डिसेंबर रोजी होणारे आंदोलन हे दिशादर्शक असेल. सगळ्या शाळा बंद ठेवून सरकारला विचार करायला भाग पाडू या." पत्रकार परिषदेला मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष राहुल पवार, सहसचिव श्रीकांत पाटील, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष प्रमोद तौंदकर, शिक्षक संघाचे राज्य कार्याध्यक्ष विलास चौगले, जिल्हा सरचिटणीस सुनील पाटील, प्राथमिक शिक्षक समितीचे सुधाकर सावंत उमेश देसाई, खाजगी शिक्षक संघटनेचे राजेंद्र कोरे, शिक्षक सेनेचे संतोष आयरे, मुख्याध्यापक बी एस मडिवाळ, विष्णू भोईटे, शिक्षक बँकेचे संचालक गजानन कांबळे आदी उपस्थित होते