मार्केट सेस रद्दसाठी व्यापारी एकवटले, शुक्रवारी जिल्ह्यातील व्यापार बंद
schedule02 Dec 25 person by visibility 4 categoryउद्योग
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : मार्केट सेस रद्द करण्यासह विविध मागण्यांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य व्यापार कृती समितीने शुक्रवारी, पाच डिसेंबर २०२५ रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी व्यापार बंद आंदोलनात जिल्ह्यातील व्यापारी व्यावसायिक सहभागी होणार आहेत. यादिवशी जिल्ह्यातील सर्व व्यावसायिक दुकाने बंद ठेवणार आहेत. तसेच सकाळी दहा वाजता छत्रपती शिवाजी चौक येथे निदर्शने करण्यात येणार आहेत. मोटारसायकल रॅली काढून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्याचे ठरले. एलबीटीप्रमाणे मार्केट सेसही रद्द करु असा निर्धार व्यापाऱ्यांनी व्यकत केला.
दि कोल्हापूर ग्रेन मर्चंटस असोसिएशनच्या कार्यालयात व्यापारी व व्यावसायिकांची सोमवारी बैठक झाली. कृषी उत्पन्न बाजार समिती नियमन (मार्केट सेस) रद्दसाठी महाराष्ट्र राज्य व्यापार कृती समितीने आंदोलनाची हाक दिली आहे. त्या आंदोलनात सहभागी होण्यासाठी आयोजित बैठकीत विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे यांनी शुक्रवारी पुकारलेल्या व्यापार बंदची माहिती दिली. सगळे व्यावसायिक आपली दुकाने बंद ठेवणार आहेत. छत्रपती शिवाजी चौक येथे निदर्शने केल्यानंतर मोटारसायकल रॅली काढण्यात येणार आहे.शहरातील प्रमुख मार्गावरुन ही रॅली जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचेल. जिल्हाधिकारी व जिल्हा उपनिबंधकांना निवेदन दिले जाईल.
महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीचे समन्वयक राजेंद्र बाठिया यांनी अन्नधान्यावरील जीएसटी अंतर्गत राज्य सरकारला २.५० टक्के जीएसटी मिळत असताना पुन्हा मार्केट सेसची सक्ती कशासाठी ? अशी विचारणाा केली. सांगलीचे शरद शहा यांनी सेस रद्दसाी साऱ्या व्यापाऱ्यांनी संघटित होऊन ताकत दाखविण्याची आवश्यकता आहे. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे सचिव अजित कोठारी, कॅमिटचे चेअरमन मोहन गुरनानी, दीपेन आगरवाल, प्रदीप कापडिया, धैर्यशील पाटील, कमलाकर बुरांडे, एकनाथ चौगुले, प्रफुल्ल संचेती, भिमजी भानुशाली यांनी मनोगत व्यक्त केले. वैभव सावर्डेकर यांनी स्वागत केले. किरण तपकिरे यांनी सूत्रसंचालन केले. विजय कागले यांनी आभार मानले. यावेळी चेंबर ऑफ कॉमर्सचे धनंजय दुग्गे, राजू पाटील, बाजार समिती संचालक कुमार आहुजा आदी उपस्थित होते.