बाजार समितीच्या सभापती-उपसभापतींच्या सत्कारात शुभेच्छांच्या सरी कमी… राजकीय कडकडाट जास्त !
schedule07 Jul 25 person by visibility 219 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे कार्यक्षेत्र साडेसहा तालुक्याचे. समितीवर राष्ट्रवादी काँगे्रस, काँग्रेस, जनसुराज्य शक्ती पक्ष. सोबतीला शेकाप आणि शिवसेनाही. सत्ताधारी आघाडीच्या फॉर्म्युलानुसार वर्षाला सभापती-उपसभापती निवड. त्यानुसार सोमवारी (सात जुलै २०२५) समितीच्या सभापतीपदी सुर्यकांत पाटील व उपसभापतीपदी राजाराम चव्हाण यांची बिनविरोध निवड झाली. दोघेही राष्ट्रवादीशी निगडीत. या निवडीनंतर बाजार समिती सभागृहात नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार आणि शुभेच्छाचा कार्यक्रम झाला. यावेळी साऱ्यांनीच नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. मात्र त्याहून अधिक त्यांच्या भाषणात राजकीय फटाके जास्त फुटले. त्यांच्या भाषणातून कळन-नकळत जिल्ह्यातील बदलत्या राजकारणाचे पडसाद उमटले.यामुळे सत्कार सोहळयात शुभेच्छांच्या सरी कमी…आणि राजकीय कडकडाट जास्त असे चित्र होते.
आमदार सतेज पाटील समर्थक संचालक सुयोग वाडकर यांच्या भाषणाने तर वातावरण चांगलेच गरम बनले. वाडकर यांनी बाजार समितीच्या व्यासपीठावरुन सतेज पाटील विरोधकांना इशारा दिला. वाडकर म्हणाले,‘ राजकारणात चढ उतार येत असतात. मात्र कोल्हापूरचे राजकारण सतेज पाटील यांना वगळून होऊ शकत नाही. बाजार समितीच्या पदाधिकारी निवडीसाठी रविवारी नेते मंडळीची बैठक झाली. त्या बैठकीतही सतेज पाटील यांचे आगमन झाल्यावरच चर्चेला सुरुवात झाली. यावरुन जिल्हयाच्या राजकारणाशी सुरुवात असो की शेवट तेथे सतेज पाटलांना सामावून घेतल्याशिवाय पुढे काही होत नाही. गेल्या २५ वर्षात सतेज पाटलांनी अनेक उन्हाळे-पावसाळे पाहिलेत. मातब्बर नेते मंडळींना आव्हान देत स्वत:चे सत्ताकेंद्र निर्माण केले आहे. आता सरकारच्या माध्यमातून विविध घटकावर दबावाचे राजकारण सुरू आहे. सतेज पाटील यांच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न होत असतो. मात्र अजून अनेक पावसाळे यायचे आहेत.’असा इशारा दिला. भाषणात त्यांनी, मावळते सभापती प्रकाश देसाई यांच्याविषयी बोलताना ते शांत, संयमी वृत्तीचे आहेत. काही कामे झाली, काही झाली नाहीत असे नमूद केले.
मात्र वाडकर यांचा मुद्दा खोडून काढताना संचालक नंदकुमार वळंजू यांनी, ‘बाजार समितीच्या विकासात प्रकाश टाकण्याचे काम मावळते सभापती देसाई यांनी केले आहे. नियमानुसार कामकाज केले. मी २८ वर्षे बाजार समितीत संचालक म्हणून काम केले, मात्र त्यांच्याइतका संयमी सभापती पाहिला नाही. पहिल्या वर्षी सभापती म्हणून काम करताना भारत पाटील यांचे वर्ष अभ्यास करण्यात गेले.’असे म्हटले. त्यावर भारत पाटील यांनी, ‘ माझा कामकाज बाजार समितीच्या उन्नतीसाठी होता. काही चांगले पायंडे पाडण्याचा प्रयत्न केला. मात्र काही जणांनी त्यामध्ये खोडा घालण्याचा खटाटोप केला. संचालक वळंजू यांनी वडिलकीच्या नात्यांनी आम्हाला मार्गदर्शन करायला हवे होते, पण त्यांच्याकडून तसे काही घडले नाही.’असा पलटवार केला. त्यावर वळंजू यांनी मला उत्तर द्यायचे आहे असे म्हणत बोलायला उभे राहिले, मात्र पाटील यांनी ‘हे सभागृह नाही, सदिच्छा कार्यक्रम आहे. यामुळे कोणावर व्यक्तिगत टिप्पणी नको.’असे स्पष्ट करत या विषयी पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापुरी फेटा बांधून नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार झाला. यानंतर शुभेच्छांच्या भाषणाला सुरुवात झाली. संचालक शेखर देसाई यांनी बाजार समितीही शेतकऱ्यांसाठी आहे. प्रत्येक संचालकांवर कामाची जबाबदारी सोपवा. असे सांगताना ‘मी बिद्री कारखान्यांशी निगडीत आहे. चेअरमन के. पी. पाटील यांनी कारखान्याचा उत्कृष्ट कामकाज केले आहे. मात्र कारखान्याचे काही संचालक आम्ही सांगूनही कामे करत नाहीत. सहा सहा महिने पाठपुरावा करुनही कामे होत नाहीत. यातील गमंतीचा भाग सोडा. मात्र तसा अनुभव शेतकऱ्यांना बाजार समितीच्या संचालकासंबंधी येऊ नये.’असे मत मांडले. त्यानंतर संचालक शिवाजीराव पाटील यांनी, सभापती सुर्यकांत पाटील यांच्या सभापतीपदाच्या कालावधीत बाजार समितीचे उत्पन्न २५ कोटीहून अधिक झाले तर ते सार्थकी ठरेल असे म्हटले. संचालक बाळासाहेब पाटील म्हणाले, ‘बाजार समिती म्हणजे राजकीय व्यासपीठ नाही. आपले नेते सक्षम आहेत, ते जे ठरवतात ते करतात. साऱ्यांनी मिळून मार्केट कमिटी एक नंबरला आणू या.’ सभापती सुर्यकांत पाटील यांनी, ‘मार्केट कमिटीचे उत्पन्न २५ कोटीवर नेऊन राज्यातील स्टार बाजार समितीच्या पंक्तीत कोल्हापूर बाजार समितीला स्थान मिळवून देऊ.’अशी ग्वाही दिली. बैठकीला संचालक शंकर पाटील, पैलवान संभाजी पाटील, मेघा राजेंद्र देसाई, सोनाली शरद पाटील, नानासो कांबळे, पांडूरंग काशीद, , दिलीप पोवार, सचिव तानाजी दळवी, उपसचिव वसंत पाटील आदी उपस्थित होते.
………………
पन्नास महापौरांनी छत्रपती शिवरायांचा एकही पुतळा उभारला नाही
तत्पूर्वी संचालक नंदकुमार वळंजू यांनी आपण महापालिकेत नगरसेवक, महापौर म्हणून काम केले आहे. बाजार समितीत २८ वर्षे संचालक आहे. साऱ्यांना बरोबर घेऊन नूतन सभापतींनी कामकाज करावे अशी अपेक्षा व्यक्त केली. बाजार समितीचे संचालक कुमार आहुजा यांनी भाषणात बाजार समितीच्या आवरात छत्रपती शिवरायांचा पुतळा उभारावा अशी मागणी नूतन सभापतीकडे केली. वळंजू यांच्या भाषणाचा संदर्भ घेत सभापती सुर्यकांत पाटील यांनी भाषणात ‘साऱ्यांना सोबत घेऊन कामकाज केले जाईल. आपण, बाचणीत छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारला आहे. बाजार समितीतही उभारु. कोल्हापुरात पन्नासहून अधिक महापौर झाले. पण त्यांच्या कालावधीत छत्रपती शिवरायांचा एकही पुतळा उभारल्याचे दिसत नाही.’