भैय्या माने पुणे पदवीधरच्या मैदानात ! महायुतीकडून इच्छुक, मतदार नोंदणीसाठी तयारी जोरात !!
schedule07 Jul 25 person by visibility 524 categoryराजकीय

आप्पासाहेब माळी, महाराष्ट्र न्यूज वन : पुणे पदवीधर विधान परिषद मतदारसंघाच्या निवडणुकीला अजून दीड वर्षाचा कालावधी आहे. मात्र इच्छुक उमेदवारांनी आतापासूनच तयारी सुरू केल्या आहेत. येत्या दीड-दोन महिन्यात मतदार नोंदणी प्रक्रियेला सुरुवात होणार आहे. यंदा निवडणूक लढवायची या इराद्याने कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने हे मैदानात उतरले आहेत. महायुतीकडून ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. मतदारसंघातील पाचही जिल्ह्यात त्यांनी मतदार नोंदणीची तयारी केली आहे. गाठीभेटी घेऊन ते मतदार नोंदणी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
सध्या पुणे पदवीधर मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे आमदार अरुण लाड करत आहेत. राष्ट्रवादीत फाटाफूट होऊन अजित पवार गट महायुती बरोबर आहे. महायुतीच्या जागा वाटपाच्या फॉर्म्युलानुसार सध्या ज्या पक्षाकडे मतदारसंघ आहे, त्या पक्षाला त्या ठिकाणी उमेदवारी असे सूत्र आहे. त्यानुसार पुणे पदवीधर मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाला मिळणार अशी खात्री पक्षाचे नेतेमंडळी बाळगून आहेत. मंत्री मुश्रीफ यांनी काही दिवसापूर्वी पुणे पदवीधरमधून भैय्या माने उमेदवार असतींल असे सूतोवाच केले होते.
वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांचे कट्टर समर्थक म्हणून भैय्या माने यांची ओळख आहे. कागलचे राजकारण हे गटातटाभोवीत जास्त फिरणारे. कागलच्या राजकारणात भैय्या माने हे मुश्रीफ गटाचे सरसेनापती म्हणून परिचित आहे. गेल्या तीन दशकाहून अधिक काळ ते समाजकारण, राजकारण, शैक्षणिक क्षेत्रात आघाडीवर आहेत. शिवाजी विद्यापीठ विकास आघाडीचे उपाध्यक्ष आहेत. शिवाजी विद्यापीठातील विविध अधिकार मंडळावर काम केले आहे. शिवाजी विद्यापीठातील अधिसभा, व्यवस्थापन परिषद, अॅकेडमिक कौन्सिल अशा अधिकार मंडळावर काम करताना छाप पाडली आहे. कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून प्रतिनिधीत्व करत आहेत. कागल नगरपालिकेत नगरपालिका, नगराध्यक्ष म्हणून काम केले आहे. विविध ठिकाणी काम करत असताना जनसंपर्क, कामाचा अनुभव या बळावर ते यंदा पुणे पदवीधरमधून लढण्यासाठी तयारी करत आहेत. विविध पक्षातींल नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चांगले संबंध आहेत.
यासंबंधी संपर्क साधला असता भैय्या माने म्हणाले ‘पुणे पदवीधर विधान परिषद मतदार संघातून महायुतीकडून निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीला सामोरे जात असताना मतदार नोंदणी अतिशय महत्वाची आहे. येत्या काही दिवसात मतदार नोंदणीला सुरुवात होईल. दरम्यान गेल्या निवडणुकीत पुणे पदवीधर मतदारसंघासाठी मी उमेदवारी अर्ज भरला होता. त्या निवडणुकीत क्रांतिअग्रणी जी. डी. लाड यांचे चिरंजीव अरुण लाड यांना पक्षाने उमेदवारी दिली. नेते मंडळींनी मला उमेदवारी मागे घेण्याविषयी सांगितले. क्रांतिअग्रणी जी. डी. लाड यांच्या कुटुंबांतील सदस्य उमेदवार असल्यामुळे मी पदवीधरमधून उमेदवारी मागे घेतली. लाड यांच्या विजयासाठी आम्ही प्रयत्न केले. यंदा, महायुतीकडून लढण्याची ईच्छा आहे. ”