जिल्हा बँकेचे राजकारण वेगळे- गोकुळचे राजकारण वेगळे, संचालक वाढवून दूध उत्पादकांना काय फायदा ?
schedule17 Jul 25 person by visibility 151 categoryराजकीय

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या आगामी निवडणुकीत संचालकांची संख्या २१ वरुन २५ करण्यावरुन नेतेमंडळीत मतभेद असल्याचे उघड होत आहे. महायुतीचे नेते मंडळीमध्येच संचालक वाढीवरुन एकमत नाही. गोकुळच्या संचालक मंडळाच्या बैठकीत संचालिका शौमिका महाडिक यांनी संचालक वाढीला विरोध दर्शविला होता. याविषयावरुन माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी गोकुळच्या सत्ताधारी नेतेमंडळीवर टीकास्त्र सोडले आहे. ‘दूध संस्था वाढवून दूध संकलनात वाढ झाली नाही, मग संचालकांची संख्या वाढवून दूध वाढणार आहे का ? जिल्हा बँकेचे राजकारण वेगळे, गोकुळचे राजकारण वेगळे. संचालकांची संख्या वाढवून गोकुळचा विकास होत नाही’असा खडा सवाल मंत्री हसन मुश्रीफ यांना केला.
दोनच दिवसापूर्वी गोकुळच्या संचालकांची बैठक झाली. त्यामध्ये संचालक संख्या २१ करण्याचा विषय मंजूर करण्यात आला. आता हा ठराव गोकुळ दूध संघाच्या वार्षिक सर्वसाधारण सभेपुढे मान्यतेसाठी मांडला जाईल. वार्षिक सर्वसाधारण सभेची मान्यता महत्वाची आहे. दरम्यान गोकुळच्या संचालकांची संख्या वाढवून निवडणूक बिनविरोध करण्याच्या हालचाली आहेत. यावर महाडिक यांनी भूमिका स्पष्ट केली. मुश्रीफांना उद्देशून ते म्हणाले, ‘गोकुळ दूध संघ हा दूध उत्पादक शेतकऱ्यांचा आहे. एक गुंठाही जमीन नसलेल्या दूध उत्पादकांच्या मालकीचा हा संघ आहे. उत्पादकांच्या हिताचा कारभार झाला पाहिजे. त्या अनुषंगाने निर्णय होणे अपेक्षित असताना संघ आपल्याच ताब्यात असावा यासाठी होणारी खेळी गोकुळला अडचणीत आणेल. संघाची निवडणूक बिनविरोध करा, पण त्यात तुम्ही असता कामा नये. जिल्हा बँकेचे राजकारण वेगळे, गोकुळचे राजकारण वेगळे.’
महाडिक म्हणाले, ‘महायुती म्हणून गोकुळमध्ये आम्ही सर्वजण एकत्र आहोत,मात्र मंत्री मुश्रीफ हेच टोकण देत असतील तर ते योग्य नाही. सगळयांना विश्वासात घेऊन कामकाज झाले पाहिजे. गेल्या चार वर्षात पारदर्शक आणि विश्वासाने कारभार केला म्हणता, मग टोकण देण्याची वेळ का आली ? गोकुळच्या राजकारणात हा पायंडा चुकीचा आहे. दूध उत्पादकांनाही हा प्रकार मान्य नाही. गोकुळमध्ये आम्ही ३२ वर्षे होतो. पण १८ पेक्षा जास्त संचालक कधी केले नाहीत. संचालकांची संख्या वाढवून गोकुळचा विकास होत नाही. संचालकांची संख्या वाढली तर संघाचा खर्च वाढत जाईल. गोकुळच्या गेल्या वर्षींच्या अहवालात ठेवी १४२ कोटी होत्या. यावर्षी त्या ५४२ कोटी झाल्याचे दाखवले. एका वर्षात एवढया ठेवी कशा वाढल्या ? या ठेवी कोठून आल्या ? यासंबंधीचा हिशेब गोकुळमधील सत्ताधाऱ्यांनी दिला पाहिजे. दहा वर्षापूर्वी प्राप्तिकर विभागाने संघाची खाती गोठवत ३२ कोटी रुपयांचा प्राप्तिकर वसूल केला. दोन टप्प्यात या रकमेचा परतावा मिळाला., ही रक्कम कुठे गेली ? ’
निविदा न काढता साडेचार कोटीची खरेदी
‘गोकुळमार्फत दूध संस्थांना जाजम व घडयाळ देण्यासाठी साडे चार कोटी रुपयांची खरेदी झाली आहे. निविदा न काढता इतक्या मोठया रकमेची निविदा कशी केली ? कार्यकारी संचालकांना तीन लाखांपेक्षा जास्त खरेदीचे अधिकार नाहीत, मग कोटीची खरेदी होते कशी ? एका दिवसात सगळे पैसे दिले, हा सारा व्यवहार संशयास्पद आहे. भोकरपाडा येथे ३० ते ३२ कोटी रुपये खर्चून जमीन खरेदी केली आहे. पण ही जागा विकसकाला दिली ? मग गोकुळचे पैसे परत मिळणार की नाही ?’ असा सवाल महाडिक यांनी गोकुळमधील सत्ताधारी नेत्यांना केला.