संस्कृती माणसाला सभ्य बनविते, धर्म माणसाला कडवट बनवतो-प्राचार्य सुनीलकुमार लवटे
schedule16 Jul 25 person by visibility 199 categoryशैक्षणिक

तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्रींच्या जीवनकार्यावर वर्षभरात एक हजार पानांच्या सचित्र ग्रंथाची निर्मिती
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांचे जीवनसार उलगडून सांगणारे एक हजार पानांचे सचित्र ग्रंथ लिहित आहे. येत्या वर्षभरात ते पूर्ण होईल. तर्कतीर्थांच्यावरील हा ग्रंथ नव्या वैचारिक परिवर्तनाची नांदी ठरेल.’ असे मत विचारवंत प्राचार्य डॉ. सुनीलकुमार लवटे यांनी व्यक्त केले. प्रकट मुलाखती दरम्यान प्राचार्य लवटे यांनी ‘धर्म व संस्कृतीची तुलना केल्यास संस्कृती श्रेष्ठ मानली जाते. कारण संस्कृती माणसाला सभ्य बनविते. आणि धर्म माणसाला कडवट बनवतो. तर्कतीर्थांनी हिंदू धर्माला वैदिक संस्कृती हा शब्द वापरला.’याकडे लक्ष वेधले.
शिवाजी विद्यापीठ येथे तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या जीवनकार्यावर आधारित दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्र आयोजित केले आहे. बुधवाी (16 १६ जुलै २०२५) चर्चासत्राच्या उद्घाटन सत्रानंतर प्राचार्य लवटे यांची प्रकट मुलाखत झाली. शिवाजी विद्यापीठाचे मराठी विभागप्रमुख डॉ. नंदकुमार मोरे आणि ‘विचारशलाका’चे संपादक डॉ. नागोराव कुंभार यांनी मुलाखती घेतली. शिवाजी विद्यापीठातील राजर्षी शाहू सभागृह येथे चर्चासत्र सुरू आहे. या मुलाखती दरम्यान तर्कतीर्थांच्या जीवनपैलूंचे दर्शन घडले.
प्राचार्य लवटे म्हणाले, ‘माझ्या दृष्टीने २१ वे शतक हे विसंगतीचे शतक आहे. अशा काळात आपण त्यांना समजून घ्यायचा प्रयत्न करतो. विचारातचे सतत बदतले टप्पे त्यांच्या आयुष्यात येत गेले. त्यांनी अनेकदा म्हटले आहे, की वाहवत गेलेला मी विद्वान आहे. पण लोकांना हे माहित नाही की, वाहत्या नदीनेच विकास होत असतो. वाहत राहणं थांबलं आणि एकाच अंगानी विचार करत बसलं तर विकासाची गती मंदावते. एकेकाळी मार्क्स हा जगभर राज्य करेल असे वाटत होतं, आता अपवादात्मक देशात मार्क्सवाद आहे. बहुसंख्य देश लोकशाहीवादी आहेत.
झापडबंद पद्धतीने कोणत्याही विचारधारेचा अभ्यास करणं सोडले पाहिजे. पोपटपंची शिक्षणाने माणूस घडत नाही. तर्कतीर्थांचे औपचारिक शिक्षण हे केवळ दोन इयत्तेचे होते. त्यांनी संपूर्ण शिक्षण हे स्वयंम शिक्षण पद्धतीने आत्मसात केले. खरं तर, स्वाध्याय शिक्षणाचे तर्कतीर्थ हे ज्वलंत उदाहरण आहे. अधिक उज्ज्वल, उन्नत ज्ञानप्राप्तीसाठी कठोर परिश्रम घ्यायला हवे. अशी ज्ञानसाधना तर्कतीर्थांकडून शिकावे. स्वाध्याय म्हणजे ज्ञानसाधना. असे स्वाध्यायी शिक्षण हे व्यक्तिमत्वाचा विकास करते. ’
तर्कतीर्थांच्या व्यक्तिमत्वावर कोणाचा प्रभाव होता ? या प्रश्नावर प्राचार्य लवटे म्हणाले, ‘तर्कतीर्थांच्या व्यक्तिमत्वावर केवलानंद सरस्वती, मानवेंद्रनाथ रॉय आणि महात्मा गांधी यांचा मोठा प्रभाव आहे. महात्मा गांधीजींनी त्यांना भारताकडे बघायला शिकवलं. ज्ञानाचा आणि चारित्र्याचा निकटचा संबंध असतो. त्यांच्याकडे छोट्या-छोट्या गोष्टीतून मोठया गोष्टी सांगण्याची कला होती. १९९० नंतर भारतात भाषिक व वैचारिक उदारता निर्माण झाली. तर्कतीर्थांनी वेदांताला आधुनिक रुप दिलं. जे जुने, प्राचीन ते अधिक वैश्विक असते ही त्यांची धारणा होती. मी तर्कतीर्थ वाचले नसते तर वेद वाचले नसते. मानवतावाद हाच सर्वश्रेष्ठ आहे. म्हणून मानव्याकडे नेणाऱ्या विचारधारेला महत्व आहे. धर्म व संस्कृतीची तुलना केल्यास संस्कृती श्रेष्ठ मानली जाते. कारण संस्कृती माणसाला सभ्य बनविते. आणि धर्म माणसाला कडवट बनवतो. त्यांनी हिंदू धर्माला वैदिक संस्कृती हा शब्द वापरला. ’
मराठी भाषेसाठी तर्कतीर्थांचे योगदान ? या प्रश्नावर प्राचार्य लवटे यांनी अतिशय नेटकेपणाने त्यांचे मोठेपण मांडले. ते म्हणाले, ‘मराठी साहित्य व संस्कृती मंडळात काम करताना तर्कतीर्थांनी कोणतीही भाषा अस्पृश्य ठेवली नाही. बोलीभाषेचा प्राथमिक अभ्यासही त्यांनी सुरू केला. तर्कतीर्थांचे मराठी भाषेसाठीचे योगदान जाणून घ्यायये असल्याचे त्यांचे केवळ स्थापत्य आणि शिल्पकोष अभ्यासले तर ते पुरेसे ठरेल.
मुळात तर्कतीर्थांना माणूस व विचारवंत म्हणून वेगळे करता येत नाही. तर्कतीर्थांचे संपुर्ण आयुष्य हे अंत्यत प्रक्षृब्ध साहित्य आहे. तर्कतीर्थांची चारित्रिक मांडणी महाराष्ट्राने वस्तुनिष्ठपणे केली नाही. त्यांच्या हयातीतही त्यांच्या जीवनकार्याविषयी फारशी कुणी समीक्षा केली नाही. एक म्हणजे आदरयुक्त दबदबा आणि दुसरे चोख चिकित्सक प्रतिवाद यामुळे त्यांच्या पश्चातही कुणी धाडस केले नाही. म्हणून तर्कतीर्थांच्या विचारांची नव्या काळात विवेकनिष्ठ पद्धतीने कठोर चिकित्सा होण्याची गरज आहे. या दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय चर्चासत्राद्वारे भविष्यकाळात कोणी कठोरपणे समीक्षा केली तर हे चर्चासत्र सार्थकी लागेल असे म्हणावे लागेल.
परंपरा व आधुनिकता या दोन्ही गोष्टी सतत एकमेकाच्या विरुद्ध दिशेने जाणाऱ्या आहेत. निशस्त्र परिवर्तनाने हृदय परिवर्तन, समाज बदलता आला पाहिजे. सत्तेने समाज बदलत नाही. हृदय परिवर्तनाने सारा भारत एकवटला पाहिजे. एक हृदयी भारत बनला पाहिजे या दृष्टीने तर्कतीर्थांच्या विचारकार्याकडे पाहिले पाहिजे. हिंदू धर्माची समीक्षा, आनंदमीमांसा व जडवाद हे त्यांचे तीन मोलाचे ग्रंथ आहेत. भारतीय तत्वज्ञान हे मोक्षवादी तत्वज्ञान आाहे. मोक्षवादी तत्वज्ञानात निराशा आणि दु:ख असते. केवळ विचारधारा श्रेष्ठ असून चालत नाही तर व्यवहारही श्रेष्ठ असला पाहिजे. क्षणिक सुख आणि चंगळवादातून नव्हे तर ज्ञानसाधनेतून आनंद मिळतो. तरुण पिढीने हे शिकले पाहिजे. ’