कोल्हापूरला जगाशी जोडणारा राजा म्हणजे छत्रपती राजाराम महाराज-इतिहास अभ्यासक भारत महारुगडे
schedule30 Nov 24 person by visibility 208 categoryसामाजिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘ शिक्षण, शेती, क्रीडा, स्थापत्यशास्त्र अशा सर्वच क्षेत्रात नाविन्यपूर्ण बदल घडविण्यासाठी प्रयत्नशील असणारा राजा म्हणजे छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) होय. कोल्हापूरच्या प्रगतीत त्यांचा मोठा वाटा आहे. त्यांनी कोल्हापूरला जगाशी जोडले.’असे उद्गगार इतिहास अभ्यासक व्याख्याते भारत महारुगडे यांनी काढले.
छत्रपती राजाराम महाराज (दुसरे) यांची १५४ वी पुण्यतिथीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन केले होते. पाटणकर कुटुंबीयांच्या पुढाकारातून हा कार्यक्रम कोल्हापूर येथील राजाराम कॉलेज येथील सभागृहात झाला. नाबार्डचे माजी अध्यक्ष यशवंतराव थोरात हे अध्यक्षस्थानी होते. राजाराम कॉलेजच्या प्राचार्या डॉ. अनिता बोडके या प्रमुख पाहुण्या होत्या. इतिहास अभ्यासक डॉ. ईस्माइल पठाण, रिझर्व्ह बँकेच्या माजी गव्हर्नर डॉ. उषा थोरात, बी एन पाटणकर ट्रस्टचे चेअरमन बाळ पाटणकर, सिद्धार्थ पाटणकर व नकुल पाटणकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
छत्रपती राजाराम महाराज यांच्या प्रतिमा पूजनाने कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. छत्रपती राजाराम महाराज यांचे शिक्षण क्षेत्रातील अलौकिक कार्य आजच्या विद्यार्थ्यांना समजावे व त्यांची प्रतिमा विद्यार्थ्यांमध्ये रुजावी हा कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी सांगितले. व्याख्याते महारुगडे म्हणाले, ‘ कोल्हापूरच्या प्रगतीमध्ये व विकासामध्ये छत्रपती राजाराम महाराजांचा मोलाचा वाटा आहे. राजा असूनही त्यांनी बडेजाव केला नाही. त्यांना शिक्षणाविषयी तळमळ होती. कोल्हापूरच्या विकासासाठी व शिक्षण क्षेत्रासाठी ते इंग्लडला गेले. विविध क्षेत्रासाठी काम केले.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना डॉ. थोरात म्हणाले, ‘अल्पावधीत आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी इटलीतील फ्लोरेन्स या ठिकाणी आलेल्या या राजाचे महत्व इटलीतील लोकांनी ओळखले म्हणूनच आज दीडशे वर्ष झाली तरी फ्लॉरेन्स येथे त्यांच्या स्मृती जिवंत ठेवल्या आहेत. राजाराम महाविद्यालय आणि फ्लोरेन्स विद्यापीठ यांच्यात शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी समझोता करार करावा अशी अपेक्षा व्यक्त केली त्यामुळे विद्यार्थ्यांना अधिक प्रगत होण्याची संधी उपलब्ध होईल. ’ कार्यक्रमाला ऋतुराज इंगळे, सचिन मेनन, नंदिता घाटगे उपस्थित होते. प्रा. डॉ. रघुनाथ कडाकणे यांनी प्रास्ताविक केले. प्रा. डॉ. ऋषिकेश दळवी यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. ढवणे यांनी आभार मानले.