हद्दवाढीमुळेच शहराचा विस्तार- विकास, कोल्हापुरात औद्योगिक इको सिस्टीम- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
schedule12 Jan 26 person by visibility 131 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोणत्याही शहराचा विकास आणि विस्तार हा हद्दवाढीमुळेच झाली आहे. कोल्हापूरच्या विकास-विस्तारसाठी हद्दवाढ केलीच पाहिजे. तसेच मुंबई-बेंगळुरु औद्योगिक कॉरिडॉरमुळे कोल्हापूरला औद्योगिक इको सिस्टीम तयार होईल. ’असे स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मांडले. ‘प्रभागाचा मी मालक या भावनेने नव्हे तर जनतेचा सेवक म्हणून काम करणाऱ्यांना निवडून द्या.’असे आवाहन त्यांनी केले. खेळाच्या विकासाकरिता वर्ल्ड क्लास इन्फ्रास्ट्रक्चर आम्ही कोल्हापुरात तयार करू असे मुख्यमंत्र्यांनी आश्वस्त केले.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीत महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री फडणवीस हे सोमवारी, (१२ जानेवारी २०२६) कोल्हापूर दौऱ्यावर होते. त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हॉटेल पॅव्हेलियन येथे ‘मिसळ कट्टा’ या संकल्पनेतंर्गत जनसंवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.निमंत्रितासाठी आयोजित या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी शहर विकासाची संकल्पना मांडली. यूथ आयकॉन कृष्णराज महाडिक, अभिनेते स्वप्निल राजशेखर, बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली. या मुलाखती दरम्यान मुख्यमंत्री फडणवीस यांनी आमच्या सरकारने कोल्हापूरला टोलमुक्त केल्याची आठवण करुन दिली.
‘कोल्हापूरचा विकासाचा नवा चेहरा देण्याचा आमचा प्रयत्न आहे. रिंगरोडचे नेटवर्क, उड्डाणपुलामुळे वाहतुकीची समस्या दूर होईल. शहरांचा विकास साधताना त्याला पर्यावरणपूरक चेहरा देणे अत्यावश्यक आहे. यामुळे नजीकच्या काळात पर्यावरण संवर्धन, हवा व पाणी स्वच्छता यासाठी काम करावे लागणार आहे. प्रत्येक शहराची एक स्वतंत्र ओळख असते, संस्कृती असते आणि ज्या त्या शहराची एक क्षमता असते. कोल्हापूर तर क्षमतावान शहर आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्यामुळे या शहराला उद्यमशीलतेचा वसा लाभला आहे.
कोल्हापूर ही जुनी औद्योगिक नगरी आहे. युरोप दौऱ्यात राजर्षी शाहू महाराज यांनी ज्या ज्या नवीन गोष्टी पाहिल्या, त्या साऱ्या गोष्टी त्यांनी कोल्हापुरात सुरू केल्या. यामुळे कोल्हापूर शहराला मोठी परंपरा लाभली आहे.या शहरांशी निगडीत जे प्रश्न आहेत, ते सोडविण्याला प्राधान्य आहे. कोल्हापुरातही गुंतवणूक वाढत आहे. अनेक कंपन्या येत आहेत. मी करार केलेल्या सात कंपन्या आहेत. घनकचरा व्यवस्थापन, वाहतूक या विषयावर काम करावे लागणार आहे.’
‘स्वातंत्र्यानंतच्या कालावधीत खेडयांचा विकास हे धोरण होते. आता चित्र बदलले आहे. गेल्या काही वर्षात नागरिकीकरण वाढले. शहरांचा विस्तार झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शहरी भागातील सेवा सुविधासाठी ५० हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेची तरतूद केली. स्मार्ट सिटी, अमृत योजना, प्रधानमंत्री आवास योजना चालू केल्या. शहरांचा विकास आता कोणी थांबवू शकत नाही.’असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्ट केले.
......................
कोल्हापुरी मिसळ, गूळ, शाहू राजांचे पुस्तक भेट
मुख्यमंत्री फडणवीस यांनी कोल्हापुरी मिसळचा आस्वाद लुटला. दरम्यान कार्यक्रमाच्या प्रारंभी भाजपचे प्रदेश सचिव महेश जाधव,महानगर जिल्हाध्यक्ष विजय जाधव, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख सुजित चव्हाण, जिल्हा समन्वयक सत्यजीत कदम, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आदिल फरास यांनी स्वागत केले. राजर्षी शाहू महाराज यांच्यावरील पुस्तक, कोल्हापुरी गूळ व कमळ चिन्हाची प्रतिकृती भेट दिली. मंत्री चंद्रकांत पाटील, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक, माजी आमदार प्रकाश आवाडे यांच्या हस्ते करवीरनिवासिनी अंबाबाई देवीची प्रतिमा भेट देण्यात आली.