बांधकाम व्यासायिक- वास्तुविशारदांचे विकासाचे व्यापक व्हिजन शहराला गतीमान बनवेल-प्रकाश आबिटकर
schedule09 Jun 25 person by visibility 73 categoryउद्योग

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर :‘ सध्याच्या गतीमान स्पर्धेत शहराचा विकास साधण्यासाठी राज्यकर्त्यांच्यासोबतच बांधकाम व्यावसायिक, अभियंते, आर्किटेक्ट यांचा सहभाग मोलाचा आहे. शहराचा विकास साधण्याची क्षमता आणि सौंदर्य खुलविण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. त्यांच्या विकासाचे व्यापक व्हिजन शहराला गतीमान बनवेल.’ असे प्रतिपादन पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी व्यक्त केले.
बिल्डर्स असोसिएशन ऑफ इंडिया, कोल्हापूर चॅप्टरतर्फे आयोजित पुरस्कार वितरण व नूतन कार्यकारिणी पदग्रहण असा संयुक्त समारंभ रविवारी दिमाखात पार पडला. याप्रसंगी ख्यातनाम स्थापत्यविशारद रामराव नागेशकर यांना मरणोत्तर जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. त्यांच्या कुटुंबियांनी हा पुरस्कार स्वीकारला. बांधकाम व्यावसायिक सुरेश गुळवणी यांना जीवन गौरव पुरस्कार तर उत्कृष्ट वास्तुनिर्मिती पुरस्कार बांधकाम व्यावसायिक शंकर पाटील यांना दिला. मानवदूत पुरस्कारांनी, हॉटेल व्यावसायिक उज्ज्वल नागेशकर व व्हाइट आर्मीचे अशोक रोकडे यांना सन्मानित केले. मानपत्र, कोल्हापुरी फेटा, शाल श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरुप आहे. रेसिडेन्सी क्लब येथे कार्यक्रम झाला.
बिल्डर्स असोसिएशनचे गव्हर्निंग कौन्सिल सदस्य प्रताप कोंडेकर यांनी असोसिएशनच्या कार्याचा आढावा घेतला. याप्रसंगी बोलताना पालकमंत्री आबिटकर यांनी पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, बेळगाव ही शहरे विकासाच्या पातळीवर कोल्हापूरपेक्षा पुढे गेली. कोल्हापूरचा गतीमान विकास साधण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. पायाभूत सुविधा, दळणवळणाची साधने, विमानतळ विस्तारीकरण, आयटी पार्क विकसित असे विविध प्रकल्प सुरू आहेत.अंबाबाई मंदिर व जोतिबा मंदिर विकास आराखड्यासाठी निधी मंजूर केला आहे. हद्दवाढीचा निर्णयही साऱ्यांनी सकारात्मकपणे घ्यायचा आहे. विकासाचा वेग साधण्यासाठी बांधकाम व्यावसायिक, अभियंते व वास्तुविशारद हे दहा पावले पुढे पाहिजेत.’ जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता अभिजीत म्हेत्रे, बिल्डर्स असोसिएशनचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष अवनिश पाटील, राज्य अध्यक्ष जगन्नाथ जाधव, क्रिडाईचे राज्य उपाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, बिल्डर्स असोसिएशनचे नूतन अध्यक्ष विजय कोंडेकर, उपाध्यक्ष अमोल कुलकर्णी यांची प्रमुख उपस्थिती होती. पंडित कंदले यांनी सूत्रसंचालन केले. मदन भंडारी यांनी आभार मानले.
……………………………………
राजकीय क्षेत्रातही शंकर पाटील मार्गदर्शक
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ‘पुरस्कारप्राप्त साऱ्यांच मान्यवरांचे समाजासाठी योगदान आहे. नागेशकर कुटुंबीयांची तिसरी पिढी आपल्या क्षेत्रात नावलौकिक प्राप्त आहे. गुणवत्तापूर्ण काम नेहमीच उच्च स्थान प्राप्त करुन देते. बांधकाम व्यावसायिक शंकर पाटील यांनी बँकिग, कृषी, सहकार, बांधकाम व्यवसाय अशा विविध क्षेत्रात भरीव ठसा उमटविला. तसेच राजकीय क्षेत्रातही ते अनेकांना मार्गदर्शक आहेत.’ पालकमंत्र्यांच्या या वक्तव्याने कार्यक्रमस्थळी हंशा पिकला.
……………….
बिल्डर्स असोसिएशन, कोल्हापूर चॅप्टरच्या अध्यक्षपदी विजय कोंडेकर
बिल्डर्स असोसिएशन कोल्हापूर चॅप्टरच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ झाला. अध्यक्षपदी विजय कोंडेकर, उपाध्यक्षपदी अमोल कुलकर्णी, सचिवपदी उमेश शेठ, कोषाध्यक्षपदी रणजीत पाटील यांची निवड करण्यात आली.कार्यकारिणीच्या संचालक मंडळात अनिकेत आगळगावकर, ऋतुराज आर पाटील, राजेश डोके, अशोक तहसिलदार, स्वप्नील बी पाटील यांचा समावेश आहे.