शारंगधर देशमुखांच्या विरोधातील लढाई वैचारिक– राहुल माने
schedule07 Jan 26 person by visibility 137 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : महापालिकेच्या २०१५ ते २०२० या सभागृहात एकाच पक्षाचे नगरसेवक असलेले शारंगधर देशमुख व राहुल माने यंदा महापालिका निवडणुकीत आमनेसामने उभे ठाकले आहेत. प्रभाग क्रमांक नऊमध्ये देशमुख आणि माने हे सर्वसाधारण गटात एकमेकांच्या विरोधात आहेत. देशमुख हे शिवसेनेचे उमेदवार आहेत. तर माने हे काँग्रेसच्या चिन्हावर लढत आहेत.या अनुषंगाने प्रसारमाध्यमाच्या प्रतिनिधींनी, माने यांना विचारले असता, ‘प्रभागात महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मोठा प्रतिसाद मिळत आहे. शारंगधर देशमुख यांच्या विरोधातील लढाई वैचारिक आहे.’असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.
कोल्हापूर महापालिका निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने जाहीरनामा प्रसिद्ध केला. खासदार शाहू महाराज व काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर व माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला. याप्रसंगी काँग्रेसचे सगळे उमेदवार उपस्थित होते. या जाहीरनाम्याविषयी बोलताना उमेदवार राहुल माने म्हणाले, ‘ काँग्रेस पक्षाने कोल्हापूर शहरातील लोकांच्या वास्तववादी अडचणी जाणून जाहीरनामा तयार केला आहे. सगळया समाजघटकाला समोर ठेवून योजना आखल्या आहेत. या योजनांच्या अंमलबजावणीसाठी निधीची कमतरता पडणार नाही, यासंबंधी ग्वाही काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील यांनी दिली आहे. काँग्रेसचा हा जाहीरनामा लोकांच्या सहभागातून तयार झाला आहे.’