लेकाच्या प्रचारार्थ माय मैदानात, महायुतीचा केला प्रचार ! सहज संवादशैलीने मंगळवार पेठवासिय भारावले !!
schedule08 Jan 26 person by visibility 107 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : जयश्री चंद्रकांत जाधव, शिवसेनेच्या उपनेत्या आणि शहराच्या माजी आमदार. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव यांच्या समाज व राजकीय कार्याचा वारसा नेटाने पुढे चालवणाऱ्या. आता जाधव कुटुंबातील तरुण पिढी महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने राजकारणात उतरली आहे. त्यांचे पुत्र सत्यजित जाधव हे प्रभाग क्रमांक 11 मधून शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. तरुण उद्योजक व आश्वासक चेहरा म्हणून ओळख असलेल्या सत्यजित जाधव यांना मतदारसंघात चांगला प्रतिसाद मिळत आहे. सत्यजित जाधव यांच्या प्रचारासाठी गुरुवारी माजी आमदार व शिवसेनेचे उपनेते जयश्री जाधव यांनी मंगळवार पेठ परिसरात पदयात्रा काढली. मंगळवार पेठेतील विविध भागातून ही पदयात्रा निघाली या पदयात्रेमध्ये भागातील नागरिक महिला मोठ्या संख्येने सहभागी झाले. ठिकठिकाणी त्यांचे स्वागत झाले. या पदयात्रेत माजी आमदार जाधव यांनी महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्या असे आवाहन मतदारांना केले. दिवंगत आमदार चंद्रकांत जाधव व माजी आमदार जयश्री जाधव यांनी प्रभाग व शहरासाठी केलेल्या कामांची आठवण करून देत शिवसेनेच्या पाठीशी ठाम राहणार अशी ग्वाही मतदारांनी दिली. मंगळवार पेठ हे जाधव यांचे होम ग्राउंड. मंगळवार पेठेतील विविध संस्था, संघटना, तालीम संस्था यांच्याशी जाधव कुटुंबियांचा निकटचा संबंध. चंद्रकांत जाधव यांच्या पश्चात ही त्यांच्या पुढील पिढीने मंगळवार पेठ परिसरातील प्रत्येकाशी जिव्हाळ्याचे नाते जपले आहे. विविध संस्था, संघटनेत सक्रिय आहेत. सत्यजित जाधव हे भागातील तरुण मंडळे, तालीम संस्था, क्रीडा संघटना यांच्यासाठी योगदान देत आहेत. त्यामुळे आमचे मतदान महायुतीला अशी ग्वाही नागरिकांनी या पदयात्रेदरम्यान दिली.