तंत्रज्ञानातील सक्षमतेमुळे विकसित भारतचे स्वप्न लवकरच सत्यात - प्रा. टी जी सीताराम
schedule08 Jan 26 person by visibility 51 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : भारतामध्ये मिळणारे अभियांत्रिकी शिक्षण हे अतिशय उच्च दर्जाचे असून त्या जोरावर आज जागतिक पातळीवर भारत तांत्रिक नेतृत्वकडे वाटचाल करत आहे. भारताच्या या तंत्रज्ञान सक्षमतेमुळे 'विकसित भारत' हे आता स्वप्न राहिलेले नसून लवकरच ते सत्यात उतरेल असे प्रतिपादन अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे (एआयसीटीई) माजी चेअरमन प्रा. टी जी सिताराम यांनी केले. डी वाय पाटील एग्रीकल्चर अँड टेक्निकल युनिव्हर्सिटी तळसंदे आणि इंडियन सोसायटी फॉर टेक्निकल एज्युकेशन (आय.एस.टी. ई.) नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'आय.एस.टी. ई. ग्लोबल टेक कॉन 2026'मध्ये प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते.
हॉटेल सयाजीच्या मेघ मल्हार सभागृहात या जागतिक परिषदेच्या पहिल्या सत्राचे उद्घाटन डी. वाय पाटील कृषी आणि तंत्र विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील व प्रा. टी. जी. सिताराम यांच्या हस्ते झाले. यावेळी माजी सनदी अधिकारी डॉ. ज्ञानेश्वर मुळे, इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजीचे माजी कुलगुरू डॉ. जी. डी. यादव, आय.आय. आय. टी.एम. ग्वाल्हेरचे संचालक प्रा. एस. एन. सिंह,कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता, आय.एस. टी. ई.चे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह देसाई, महाराष्ट्र गोवा अध्यक्ष डॉ. रणजीत सावंत, कार्यकारी समिती सदस्य डॉ. महादेव नरके, कुलसचिव डॉ. जे. ए. खोत, आय.क्यू.ए.सी. डायरेक्टर डॉ. शिवानंद शिरकोले आदी उपस्थित होते.
कुलगुरू डॉ. ए. के. गुप्ता यांनी डी. वाय पाटील ग्रुपच्या विस्ताराबाबत माहिती देऊन तंत्रशिक्षणात केलेल्या प्रगतीचा आढावा मांडला.माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे म्हणाले, आर्थिक, संरक्षण आणि शिक्षण या तीन गोष्टी सध्याच्या काळात महत्त्वाच्या आहेत. टेक्नॉलॉजीच्या बाबतीत जपान आणि युएसए कडून आपण बरेच काही शिकू शकतो. टेक्नॉलॉजी बाहेर नाही तर आपल्या आत मध्ये विकसित केली पाहिजे. डॉ. जी डी. यादव म्हणाले, आपल्याकडे खूप संधी व अनेक क्षमता आहे. शैक्षणिक पॉलिसी मध्ये काही सुधारणा करण्याची गरज आहे.डॉ. प्रतापसिंह देसाई, प्रा. एस एन सिंग, स्टार्ट अप मार्गदर्शक सचिन कुंभोज यांनी मार्गदर्शन केले. प्रा. शुभदा यादव, प्रा. शारोन काळे यांनी सूत्रसंचलन केले. डॉ. शिवानंद शिरकोले यांनी आभार मानले.