काँग्रेसच्या जाहीरनाम्यात कोल्हापूरकरांच्या आशा- आकांक्षाचे प्रतिबिंब - राजेश लाटकर
schedule08 Jan 26 person by visibility 34 categoryमहानगरपालिका
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘कोल्हापूर शहराच्या सर्वंकष विकासाचा अजेंडाच काँग्रेस पक्षाने जाहीरनामाद्वारे मांडला आहे. लोकसहभागातून हा जाहीरनामा तयार झाला. रस्ते, पार्किंग, सार्वजनिक स्वच्छता, बगिचा, वाहतुकीचे नियोजन, आयटी पार्क, उद्योगाला पोषक वातावरण, क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन, महापालिका शाळा बळकटीकरण अशा विविध विषयांशी निगडीत सूचना लोकांनी केल्या. तब्बल बारा हजाराहून अधिक लोकांच्या सूचना प्राप्त झाल्या होत्या. लोकसहभागातून साकारलेला हा अजेंडा आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा कोल्हापूरकरांच्या आशा- आकांक्षाचे प्रतिबिंब आहे.’असे स्थायी समितीचे माजी सभापती व प्रभाग क्रमांक चारमधील उमेदवार राजेश लाटकर यांनी सांगितले.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचा जाहीरनामा बुधवारी (सात जानेवारी २०२६) प्रसिद्ध करण्यात आला. खासदार शाहू महाराज, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज पाटील, आमदार जयंत आसगावकर, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह काँग्रेसचे पदाधिकारी व उमेदवारांच्या उपस्थितीमध्ये भवानी मंडप येथे हा कार्यक्रम झाला. ‘खासदार शाहू महाराज व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेली कित्येक महिने जाहीरनामा तयार करण्याची प्रक्रिया सुरू होती. नागरिकांच्या सूचना स्वीकारल्या. विविध क्षेत्रातील जाणकारांनी, आयटीतील तरुणांनी, नोकरदार वर्ग, व्यावसायिक, महिला वर्गासहित सामान्य नागरिकांनी सूचना पाठविल्या. त्यांच्या आशा -आकांक्षा जाहीरनाम्यात समाविष्ठ आहेत.’असे लाटकर यांनी सांगितले.