कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी: अभिनेते सुनील बर्वे
schedule02 Mar 26 person by visibility 21 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : ‘नटश्रेष्ठ जयशंकर दानवे यांच्या नांवे कलायात्री पुरस्कार देऊन माझा दानवे परिवाराने सन्मान केला आहे त्याचा मला आनंद आहे. अत्यल्प साधनसामुग्रीवर आपल्या अंगभूत कसबावर उत्कृष्ट कलाकृती सादर करणाऱ्या दिग्गज कलावंतानी घालून दिलेल्या पायवाटेवर आमची पिढी वाटचाल करत आहे. कोल्हापूरकरांचे प्रेम हे कलावंताला प्रेरणादायी असते.’असे उदगार अभिनेते सुनील बर्वे यांनी काढले.
दानवे परिवारातर्फे जयशंकर दानवेंच्या ११६ व्या जयंतीनिमित्त अभिनेते सुनील बर्वे यांना कलायात्री पुरस्कार प्रदान करण्यात आला. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र, सन्मानचिन्ह देऊन दानवेंचे सुपुत्र राजदर्शन दानवे आणि कन्या जयश्री दानवे यांच्या हस्ते पुरस्कार दिला गेला. यावेळी सन्मानपत्र वाचन जयश्री दानवे यांनी केले. शाहू स्मारक भवन येथे कार्यक्रम झाला. कमला कॉलेजचे मराठी विभाग प्रमुख डॉ.सुजय पाटील यांनी अभिनेता बर्वे यांची मुलाखत घेतली.
बर्वे म्हणाले, लहानपणापासून नकला करण्याच्या आवडीपोटी अभिनयाच्या प्रवासाला सुरुवात झाली. ही आवड जोपासताना डॉ.श्रीराम लागू, विक्रम गोखले, महेश मांजरेकर, सचिन खेडेकर, अतुल पुरचुरे अशा दिग्गजांची साथ लाभली. यावेळी त्यांनी त्यांच्या ‘गारवा’ या अल्बममधील गीत गाऊन प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. तसेच राजकारण या विषयावर २००९ मध्ये लिहिलेली एक पद्य कविता म्हणून दाखवली. यावेळी जयश्री दानवे लिखित चार पुस्तकांचे प्रकाशन बर्वेंच्या हस्ते झाले. अनुपमा चव्हाण यांनी सूत्रसंचालन केले. राजदर्शन दानवे यांनी आभार मानले. कार्यक्रमात आशिष भागवत, सुधीर पेटकर यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.