शिवाजी विद्यापीठ-डीवाय पाटील संस्थेत शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील संशोधनासंबंधी करार
schedule19 Jul 25 person by visibility 95 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेमध्ये शैक्षणिक व आरोग्य क्षेत्रांतील संशोधन आणि सेवा यांचे आदानप्रदान करण्याच्या अनुषंगाने सामंजस्य करार करण्यात आला. या करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कुलगुरू डॉ. राकेशकुमार शर्मा यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (१९ जुलै) स्वाक्षरी करण्यात आल्या.
शिवाजी विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील रिसर्च सेंटर व हॉस्पिटल यांच्या दरम्यान पाच वर्षांपूर्वी आरोग्य सेवांचे आदानप्रदानविषयक सामंजस्य करार करण्यात आला होता. या कराराची यशस्विता पाहून आता त्याची व्याप्ती पुढील पाच वर्षांसाठी वाढविली. यावेळी कुलगुरू डॉ. शर्मा म्हणाले, शिवाजी विद्यापीठ आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्था या दोहोंची शैक्षणिक व संशोधकीय प्रगती एकसारख्या गतीने सुरू आहे. कराराची व्याप्ती वाढल्यामुळे येथून पुढील काळात वैद्यकीय सेवांच्या पलिकडे इतरही विविध विभागांमध्ये सहकार्यवृद्धी करता येणे शक्य होईल. कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, सामंजस्य कराराची व्याप्ती आता व्यक्तींकडून संस्थांकडे सरकली आहे. शिवाजी विद्यापीठात सूक्ष्मजीवशास्त्र, मेडिकल इन्फॉर्मेशन मॅनेजमेंटपासून ते सामाजिक कार्यापर्यंत असे अनेक अभ्यासक्रम आहेत, जे वैद्यकीय क्षेत्राला पूरक आणि उपयुक्त आहेत.
यावेळी विद्यापीठाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. विनिता रानडे यांनी करारासंबंधी माहिती दिली. करारावर शिवाजी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. विलास शिंदे आणि डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेचे कुलसचिव डॉ. विश्वनाथ भोसले यांनी स्वाक्षरी केल्या. अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. सागर डेळेकर यांनी प्रास्ताविक केले.कार्यक्रमास शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव, वित्त व लेखाधिकारी डॉ. सुहासिनी पाटील, डी.वाय. पाटील शिक्षण संस्थेच्या अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या संचालक डॉ. शिंम्पा शर्मा, संशोधन संचालक डॉ. सी.डी. लोखंडे, अधिष्ठाता डॉ. राजेश कल्लाप्पा, वैद्यकीय अधीक्षक डॉ. वैशाली गायकवाड, उपकुलसचिव डॉ. संजय जाधव, विश्वजीत खोत, विनोद पंडित आदी उपस्थित होते.