कॉलेजमध्ये नवीन प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींच्या स्वागताचा हटके कार्यक्रम, चार दिवसीय इंडक्शन प्रोग्राम
schedule19 Jul 25 person by visibility 86 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : राधानगरी तालुक्यातील तिटवे येथील शहीद वीरपत्नी लक्ष्मी महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींसाठी चार दिवसीय इंडक्शन प्रोग्राम जल्लोषात पार पडला. “शिक्षणाच्या वाटचालीतील सुरुवात ही प्रेरणादायी आणि समृद्ध करणारी असावी,” या हेतूने आयोजित या कार्यक्रमात ज्ञान, करिअर, कला आणि मूल्यशिक्षणाचा सुंदर संगम साधण्यात आला.
विद्यार्थिनींच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी विविध तज्ज्ञांनी मार्गदर्शन केलं. करिअर निवड, आत्मपरीक्षण, आणि जीवनातील उद्दिष्टांबद्दल वैचारिक सत्रांचे आयोजन करण्यात आले. "टेक चार्ज ऑफ युवर लाईफ" या विषयावर प्रा. अविनाश पालकर यांनी मार्गदर्शन केले. रवी टिंगे यांनी मानसिक आरोग्याच्या दृष्टीने "तणाव व्यवस्थापन" या विषयावर मार्गदर्शन केले. तणावाची कारणे, परिणाम आणि त्यावर उपाय याबाबत विचारप्रवर्तक माहिती दिली. ध्यान, श्वसनाचे व्यायाम, आणि सकारात्मक विचारांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले.
ग्रंथालयाचा प्रभावी वापर कसा करावा हे शहीद ग्रंथालयाचे ग्रंथपाल संग्राम किल्लेदार यांनी सांगितले. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीमार्फत ‘जोडीदारांची विवेकी निवड’ या विषयावरही संवादात्मक सत्र घेतले. इंडेक्स कार्यक्रमात मेहंदी, रांगोळी अशा स्पर्धांमधून विद्यार्थिनींनी आपले कलागुण खुलवले. चक्रेश्वरवाडी येथे क्षेत्रभेट घेऊन इतिहासाची ओळख करून देण्यात आली आणि पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपणही करण्यात आले.
“महाविद्यालयाने पहिल्याच आठवड्यात आमच्या विचारांना आणि कलागुणांना असा वाव दिला, ही अनुभवांची शिदोरी आमच्या आयुष्यभर उपयोगी पडेल.” अशा भावना विद्यार्थिनींनी व्यक्त केल्या कार्यक्रमाचे समन्वयन प्रा. अविनाश पालकर यांनी केले. यावेळी संस्थेच्या अध्यक्षा वीरपत्नी लक्ष्मीबाई पाटील प्रमुख उपस्थित होत्या. जागतिक शिक्षणतज्ज्ञ डॉ. जगन्नाथ पाटील यांचे सहकार्य लाभले. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रशांत पालकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम यशस्वी ठरला.