सावित्रीबाई फुले हॉस्पिटलमध्ये सृष्टी मोफत वंध्यत्व सल्ला केंद्र, पालकमंत्र्याच्या हस्ते लोकार्पण
schedule19 Jul 25 person by visibility 94 categoryमहानगरपालिका

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी : कोल्हापूर महानगरपालिका व सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ. आणि टेस्ट ट्यूब बेबी सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने सावित्रीबाई फुले रुग्णालयात नव्याने सुरू करण्यात आलेल्या ‘सृष्टी मोफत वंध्यत्व सल्ला केंद्रा’चे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्राथमिक स्वरूपात उत्कृष्ट काम करणाऱ्या आशा वर्कर्सचा पालकमंत्री आबिटकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी प्रशासक के. मंजुलक्ष्मी, सिद्धगिरी जननी आय.व्ही.एफ. व टेस्ट ट्यूब बेबी सेंटरच्या मुख्य संचालिका व विभाग प्रमुख डॉ. वर्षा पाटील, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, शिल्पा दरेकर, उपआयुक्त परितोष कंकाळ, सहायक आयुक्त स्वाती दुधाणे, कृष्णा पाटील, शहर अभियंता रमेश मस्कर, आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा आदी उपस्थित होते.
पालकमंत्री आबिटकर म्हणाले, ‘सिद्धगिरीच्या जननी हॉस्पिटल व कोल्हापूर महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानाने गरजूंना या सेवेचा लाभ होणार आहे. सर्वांनी जीवनशैलीत बदल करणे ही आज काळाची गरज आहे. पौष्टिक आहार, नियमित व्यायाम व नैसर्गिक जीवनशैली अंगीकारल्यास अशा आजारांपासून बचाव होऊ शकतो. कोल्हापूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग उत्तम कामगिरी करत आहे. ’
आरोग्याधिकारी डॉ. प्रकाश पावरा म्हणाले, ही सेवा इतर कोणत्याही शासकीय रुग्णालयात उपलब्ध नसून ती फक्त सावित्रीबाई फुले रुग्णालयातच सुरू करण्यात आली आहे. गरजू वंध्यत्वग्रस्त जोडप्यांना सल्ला व उपचार उपलब्ध होणार आहेत. या केंद्रात गुरुवारी सकाळी ९ ते दुपारी १ या वेळेत मोफत सल्ला व आय.यू.आय. उपचाराची सुविधा उपलब्ध राहणार आहे. यावेळी डॉ. विवेक हळदवणेकर, डॉ. वृषाली घोरपडे, डॉ. भूषण सुतार, उपशहर अभियंता अरुण गुजर, नोडल ऑफिसर डॉ. अमोल माने, वैद्यकीय अधिकारी डॉ. संजना बागडी, डॉ. विद्या काळे-हेरवाडे, विवेक सिद्ध, सुजित पाटील, कुमार चव्हाण, प्रसाद नेवरेकर, राकेश पाटील उपस्थित होते.