शिवाजी विद्यापीठाच्या सिनेटवर प्राचार्य आर. आर. कुंभार, अभिजीत कापसे! स्थायी समितीवर पृथ्वीराज पाटील, आठ जण अधिकार मंडळ !!
schedule19 Jul 25 person by visibility 776 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा (सिनेट) सदस्य म्हणून विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक अॅड. अभिजीत कापसे यांची निवड करण्यात आली. याशिवाय आणखी नऊ जणांची विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळावर निवड झाली. शिवाजी विद्यापीठाच्या स्थायी समितीच्या बैठकीत या सदस्यांची नियुक्ती करण्यासंबंधी निर्णय झाला होता. संबंधितांच्या कागदपत्रांची पडताळणी करुन त्यांना, शनिवारी (१९ जुलै २०२५) रोजी पत्रे ईमेल करण्यात आली आहेत.
प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शिवाजी विद्यापीठाच्या स्थायी समितीची बैठक ९ जुलै रोजी झाली होती. स्थायी समितीचे सदस्य कुलसचिव व्ही. एन. शिंदे, अधिष्ठाता एम.एस.देशमुख, व्यवस्थापन परिषद सदस्य प्रा. डॉ. रघुनाथ पाटील, प्राचार्य सर्जेराव पाटील, अॅड. अजित पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक झाली होती. या बैठकीत सिनेटवर दोघे व अन्य अधिकार मंडळावर तेरा जणांच्या समावेशचा निर्णय झाला होता. दरम्यान या सदस्यांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्यात आली. तेरापैकी अकरा जणांची नियुक्ती केल्यासंदर्भातील माहिती संबंधितांना मेलद्वारे पाठविण्यात आली आहेत. आणखी दोघांच्या कागदपत्रांच्या पडताळणी अजून सुरू आहे. त्यामुळे त्यांना अजून मेल पाठविले नाहीत.
दरम्यान नियुक्त सदस्यांना कुलसचिव व्ही. एन. शिंदे याच्या स्वाक्षरीने या सदस्यांना पत्रे देण्यात आली. प्राचार्य प्रतिनिधी गटातून विवेकानंद कॉलेजचे प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार व संस्थाचालक प्रतिनिधी गटातून आचार्यरत्न देशभूषण शिक्षण प्रसारक मंडळाचे अॅड. अभिजीत कापसे यांची सिनेट सदस्य म्हणून नियुक्ती झाली. विविध अधिकार मंडळावरही नऊ जणांच्या नियुक्ती झाली. यामध्ये व्यवस्थापन परिषद सदस्य पृथ्वीराज संजय पाटील यांची स्थायी समिती सदस्यपदी नियुक्ती झाली. इलेक्ट्रॉनिक्स अभ्यास मंडळाच्या चेअरमनपदी प्रा. डॉ. भानारकर यांची निवड झाली. कम्प्युटर सायन्स अभ्यास मंडळावर प्रा. डॉ. सचिन पाटील (इस्लामपूर), स्थापत्य विषय अभ्यास मंडळावर प्रा. एस. बी. हिरवेकर (डांगे कॉलेज हातकणंगले), भूगोल विषयाच्या अभ्यास मंडळावर प्रा. डॉ. मीना पोतदार (भूगोल विभाग शिवाजी विद्यापीठ ), रसायनशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळावर प्रा. डॉ. आर. पी. पाटील (म.ह.शिंदे कॉलेज तिसंगी), मायक्रोबॉयलॉजी अभ्यास मंडळावर प्रा.डॉ. विनयकुमार सुतार (नाईक कॉलेज, चिखली), मराठी विषयाच्या अभ्यास मंडळावर प्रा. डॉ. एकनाथ पाटील (डांगे कॉलेज हातकणंगले), अर्थशास्त्र विषय अभ्यास मंडळावर डॉ. संतोष बराले (हुपरी कॉलेज) यांची निवड करण्यात आली.