शिष्यवृत्ती परीक्षा 22 फेब्रुवारीला ! केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा आठ फेब्रुवारीला !!
schedule03 Dec 25 person by visibility 22 categoryशैक्षणिक
महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ८ फेब्रुवारी २०२६ रोजी महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये एकाच दिवशी आयोजित करण्यात आली होती. तथापि केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डतर्फे केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा (CTET) ८ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित केली आहे. या परीक्षेस राज्यातील अनेक प्राथमिक व माध्यमिक शिक्षक प्रविष्ठ झालेले असल्याने त्यांना सदर परीक्षा देता यावी याकरिता पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ५ वी) व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (इ. ८ वी) ८ फेब्रुवारी २०२६ ऐवजी २२ फेब्रुवारी २०२६ रोजी घेण्यात येणार असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. दरम्यान, या परीक्षेकरिता शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरिता २७ ऑक्टोबर ते ३० नोव्हेंबर, २०२५ या कालावधीत मुदत देण्यात आली होती. तथापि शाळांना शाळा नोंदणी व विद्यार्थी ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याकरीता ८ डिसेंबर २०२५ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद आयुक्त अनुराधा ओक यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे कळविले आहे. या परीक्षेकरिता ज्या शाळांनी अद्याप ऑनलाईन आवेदनपत्र भरले नसतील, त्यांनी ८ डिसेंबर २०२५ अखेरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करावी. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्याबाबतचे सुधारित वेळापत्रक पुढीलप्रमाणे. शाळा माहिती प्रपत्र, आवेदनपत्र व शुल्क ऑनलाईन भरणे - नियमित शुल्कासह ८ डिसेंबर २०२५ पर्यंत, विलंब शुल्कासह ९ ते १५ डिसेंबर २०२५ पर्यंत, अतिविलंब शुल्कासह १६ ते २३ डिसेंबर २०२५ पर्यंत, अति विशेष विलंब शुल्कासह २४ ते ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत आहे. ३१ डिसेंबरनंतर कोणत्याही परिस्थितीत ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीने आवेदनपत्र भरता येणार नसल्याचे प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.