अवसायनात गेलेल्या बँकेला उर्जितावस्था दिली, सत्ता आल्यावर कर्जाचा व्याजदर राष्ट्रीयकृत बँकेच्या दराइतके - राजाराम वरुटे
schedule19 Jun 22 person by visibility 1004 categoryराजकीय

शिक्षक संघ प्रणित (शिवाजीराव पाटील गट) सत्तारुढ पॅनेलचा आदमापुरातून प्रचार शुभारंभ
महाराष्ट्र न्यूज 1 प्रतिनिधी, कोल्हापूर : “अवसायानात गेलेल्या शिक्षक बँकेला उर्जितावस्था मिळवून दिली. म्हणून प्राथमिक शिक्षकांची आर्थिक शिखर संस्था शाबूत राहिली. बँकेची स्थिती आज भक्कम आहे, बँक ही संघाच्या ताब्यात राहिली तर अस्तित्व राहील.संत बाळूमामाचा आशिर्वाद आणि सभासदांचा विश्वास या बळावर शिक्षक संघ प्रणित सत्तारूढ पॅनलचा विजय निश्चित आहे.’असा विश्वास महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष व शिक्षक बँकेतील सत्तारुढ गटाचे नेते राजाराम वरुटे यांनी व्यक्त केला.
दि प्राथमिक शिक्षक बँकेची निवडणूक तीन जुलै रोजी आहे. या निवडणुकीसाठी शिक्षक संघ प्रणित (शिवाजीराव पाटील गट) सत्तारुढ पॅनेलचा प्रचार शुभारंभ रविवारी (ता.१९ जून) आदमापूर येथे झाला. याप्रसंगी वरुटे यांनी, ‘पुन्हा बँकेची सत्ता ताब्यात आल्यानंतर कर्जाचा व्याजदर राष्ट्रीयकृत बँकेच्या दराइतके करू’अशी ग्वाही दिली. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी सुकाणू समितीचे अध्यक्ष दा.श.सुतार होते.
शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष वरुटे म्हणाले, ‘संचालक मंडळाने बँक सक्षमीकरण व आदर्श कारभार केला आहे. गेल्या १२ वर्षातील सर्वसाधारण सभा ४-४ तास चालल्या आहेत. संघाचे सभासद,तालुका कार्यकारिणी व विद्यमान संचालक मंडळांनी सर्वसमावेशक उमेदवार दिले आहेत. कुठेही नाराजीचा सूर नाही. बँकेच्या इमारतीचा कायापालट केला आहे. बँकेच्या खर्चात कपात, ठेवींवरील व्याजदरात वाढ आणि कर्जावरील व्याजदर कमी केला आहे.’
बँकेचे चेअरमन बाजीराव कांबळे म्हणाले,‘ ६५३ कोटींचा व्यवसाय करणाऱ्या प्राथमिक शिक्षक बँकेने स्वच्छ कारभार करून शिक्षकासमोर आदर्श ठेवला आहे. याचे सर्वस्वी श्रेय सभासद, संचालक मंडळाला जाते. सभासदांना ४० लाखांचा अपघात विमा,कर्जाचा व्याजदर १३ % वरून १०% केला आहे.’ माजी संचालक राजमोहन पाटील म्हणाले,‘२००९ पूर्वीची बँकेची स्थिती व सध्याची स्थिती पाहता सत्तारूढ संचालक मंडळाने काटकसरीचा व पारदर्शक कारभार केला आहे कायम ठेवीचे व्याज,डिव्हिडंड चे नियमित वाटप,कर्जावरील व्याजदर १३% वरून १०% करण्यात भरीव योगदान दिले आहे. सुकाणू समितीचे अध्यक्ष दा. श. सुतार म्हणाले, ‘चांगले विचार आणि संस्कार देणारी शिक्षक संघाची शिकवण आहे.सभासदानी आपल्यावर आलेली जबाबदारी निष्ठेने पार पाडा.व्यक्तीपेक्षा संस्था महत्वाची असते.’
याप्रसंगी शिवाजी पाटील, दिलीप बच्चे, नामदेव रेपे, स्मिता डीग्रजे यांनी मनोगते व्यक्त केली. उत्तम सुतार यांनी स्वागत केले. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष गणपती पाटील यांनी आभार मानले.
…………………..
वरुटे यांच्या नेतृत्वाखालील शिक्षक संघावरच सभासदांचा विश्वास
शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष संभाजी बापट म्हणाले ‘जिल्ह्यात काही शिक्षक संघटना स्वतला मोठे समजतात. मात्र स्वत:ला मोठी संघटना समजणाऱ्या त्या शिक्षक संघटनांना स्वतंत्र पॅनेल करता आले नाही. काही संघटनांना तर पॅनेल करण्याइतके उमेदवार मिळाले नाहीत. याउलट शिक्षक संघ प्रणित (शिवाजीराव पाटील गट) व शिक्षक संघाचे राज्याध्यक्ष राजाराम वरुटे यांच्या नेतृत्वाखालील सत्तारुढ पॅनेलला सभासद शिक्षकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. यावरुन आमचीच संघटना जिल्ह्यात एक नंबरची आहे हे सिद्ध झाले.’